चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:58 IST2025-03-17T21:56:21+5:302025-03-17T21:58:38+5:30
ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे.

चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...
ISRO Chandrayaan-5 : गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. चांद्रयान, सूर्ययान आणि गगनयानासारख्या मोहिमांद्वारे भारत आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवत आहे. आतापर्यंत ISRO च्या सर्व चांद्रयान मोहिमांनी चंद्राविषयी नवनवीन शोध लावले आहेत. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधणे असो किंवा जगात पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे असो. चांद्रयान मोहिमांमुळे नेहमीच भारतीय तिरंगा जगभरात उंचावला गेला आहे. अशातच आता भारताने चांद्रयान-5 मिशनची तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला नुकतीच परवानगी दिल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना उतरवण्याच्या भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
भारताची चांद्रयान-5 मोहीम काय आहे?
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणतात की, भारताने 2040 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर मानव उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताची क्षमता वाढवण्यासाठी चांद्रयान-5 मिशन पाठवले जाईल. एवढेच नाही तर भारताने 2035 पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन विकसित करण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. चांद्रयान-5 मोहिमेला सरकारने मंजुरी दिली आहे. यात 350 किलो वजनाचा रोव्हर असेल. या मोहिमेवर भारत आणि जपान एकत्र काम करणार आहे.
चांद्रयान-5 पूर्वी भारताला चांद्रयान-4 मिशन पाठवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्यासाठी ते पाठवले जाणार आहे. सरकारने चांद्रयान-4 मोहिमेला गेल्या वर्षीच मान्यता दिली होती. चंद्रावर सुरक्षित लँडिंग आणि त्यानंतर सुरक्षित परतण्यासाठी क्षमता वाढीसाठी हे अभियान पूर्ण करायचे आहे. याशिवाय, नमुने गोळा करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीच भारताने 3 चांद्रयान मोहिमा यशस्वी केल्या आहेत. भारताची चांद्रयान-3 मोहीम ही जगातील पहिली चंद्र मोहीम होती, ज्यामध्ये रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची क्षमताही तयार केली आहे.
भारत 2035 पर्यंत अंतराळात मानव पाठवणार
चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांसह भारत गगनयान मोहिमेवरही काम करत आहे. 2035 पर्यंत मानवाला अवकाशात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या फक्त 3 देश स्वतःचे स्पेस स्टेशन बनवू शकले आहेत, ज्यात अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. आता लवकरच यात भारताचे नाव जोडले जाईल.