"इस्रायलनं अनेक युद्धांत भारताला मदत केली..."; एस. जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं, गाढी 'मैत्री' अन् इराणसंदर्भातील 'चुप्पी'चं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:09 IST2026-03-26T13:06:14+5:302026-03-26T13:09:22+5:30
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येवर भारताने मौन बाळगल्याचा किंवा उशिरा प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जयशंकर यांनी फेटाळून लावला...

"इस्रायलनं अनेक युद्धांत भारताला मदत केली..."; एस. जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं, गाढी 'मैत्री' अन् इराणसंदर्भातील 'चुप्पी'चं कारण
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, "आपण अमेरिका आणि इस्रायलशी जवळीक का साधत आहोत, याचा काय फायदा?", असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. बुधवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही, असाच प्रश्न विचारण्यात आला. यावर, एस जयशंकर यांची स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, इस्रायलने भारताला अनेक युद्धांत मदत केली आहे. इस्रायल हा भारताचा एक प्रमुख 'डिफेन्स पार्टनर' असून, संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्याकडून देशाला मोलाचे सहकार्य मिळत आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत एस. जयशंकर यांना प्रश्न केला की, इस्रायल आणि अमेरिकेशी संबंध ठेवण्याचा काय फायदा आहे? यावर उत्तर देताना जयशंकर म्हणाले, अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून आपण त्यांच्याकडून उच्च दर्जाचे तंत्रज्ञान घेतो. तसेच इस्रायलने अनेक युद्धांदरम्यान भारताला सहकार्य केले आहे. असे मानले जाते की, त्यांचा रोख पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धांसंदर्भात असावा. महत्वाचे म्हणजे, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पहिल्यांदाच इस्रायलच्या युद्धकाळातील मदतीचा असा जाहीर आणि अधिकृत उल्लेख केला आहे.
८० लाख भारतीयांच्या सुरक्षेची चिंता -
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येवर भारताने मौन बाळगल्याचा किंवा उशिरा प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जयशंकर यांनी फेटाळून लावला. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणवरील हल्ल्यांची निंदा न केल्याने संबंध बिघडतील का, यावर बोलताना जयशंकर म्हणाले, इराणने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये हल्ले केले होते. आम्हाला तिथल्या परिस्थितीबद्दलही चिंता होती, कारण तिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. केवळ या दोन देशांमध्येच सुमारे ८० लाख भारतीय आहेत. यामुळे, तिथे होणाऱ्या इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांबद्दलही आम्हाला चिंता होती आणि आम्ही भारतीयांच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो.