तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 08:02 PM2017-08-31T20:02:44+5:302017-08-31T20:04:09+5:30

तिहेरी तलाक विरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 

Ishrat Jahan's two children missing from triple divorce case | तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता

तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता

Next

कोलकाता, दि. 31 -  तिहेरी तलाक विरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 
पश्चिम बंगालच्या हावडाममध्ये राहणा-या इशरत जहाँ यांनी गुरुवारी हावडाच्या गोलाबारी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इशरत जहाँ यांनी आपल्याला सासरच्या मंडळींकडून आणि शेजा-यांकडून धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. सध्या  इशरत जहाँ हावडाच्या पिलखाना भागात आपल्या चार मुलांना घेऊन राहतात. इशरत जहाँ यांना 2014 मध्ये त्यांच्या नव-याने दुबईहून फोनवरुन तलाक दिला होता.   
गेल्या आठवड्यापूर्वी तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. यामध्ये तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या तिहेरी तलाकवर बंदी घालताना केंद्र सरकारला सहा महिन्यात यासंबंधी कायदा तयार करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बहुमताने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायाचे   वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे. मात्र, काही कट्टरपंथीयांकडून या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे. 
तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ  यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे. 

कोण आहेत या पाच महिला...

इशरत जहाँ
तिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडामधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोनवरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर पंधरा वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हंटलं होतं.

शायरा बानो
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शायरा बानो यांना लग्नानंतर 15 वर्षांनी त्यांच्या पतीने तिहेरी तलाक दिला. ऑक्टोबर 2015मध्ये शायरा बानो यांना तिहेरी तलाक दिला होता. त्यांना 2 अपत्य आहेत. बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं. तिहेरी तलाक म्हणजे संविधानातील घटनाक्रम 14 आणि 15 च्या अंतर्गत मिळणाऱ्या मुलभूत अधिकारांचं उल्लघन आहे, असं शायरा बानो यांनी त्यांच्या अर्जात म्हंटलं होत.

आफरीन रहमान
जयपूरच्या 25 वर्षीय आफरीन रहमान हिनेसुद्धा तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आफरीन यांचं एका मेट्रोमोनिअल साइटवरून लग्न जमलं होतं. त्यांनी 2014 मध्ये लग्न केलं.आफरीनच्या पतीने तिला स्पीड पोस्टच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिला होता. जे अत्यंत चुकीचं होत. आफरीन रहमान हीने कोर्टाकडे तिला न्याय मिळण्याची मागणी केली होती. पती आणि सासरची लोक हुंड्यांची मागणी करतात, त्यासाठी मला मारहाण करून घराच्या बाहेर काढल्याचा आरोप आफरीन रहमान हिने केला होता. 

अतिया साबरी
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील अतिया साबरी यांच्या पतीने त्यांना एका कागदावर तीन वेळा तलाक हा शब्द लिहून दिला होता आणि अतियाशी सगळे संबंध तोडले होते. 2012मध्ये अतियाचं लग्न झालं होतं. त्यानंतर 12 डिसेंबर 2015 मध्ये त्यांना पतीने तिहेरी तलाक दिला. अतिया यांना दोन मुली आहेत. दोन मुली झाल्याने नाराज झालेल्या पतीने आणि सासरच्या लोकांनी अतिया यांना घराच्या बाहेर काढलं, असा आरोप त्यांनी केला. तसंच हुंड्यासाठीही त्यांना त्रास दिला जात होता.

गुलशन परवीन
उत्तर प्रदेशाच्या रामपूरमध्ये राहणाऱ्या गुलशन परवीन यांना त्यांच्या पतीने दहा रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठविला होता. परवीन यांचं 2013मध्ये लग्न झालं होतं तर त्यांना 2015मध्ये पतीने तिहेरी तलाक दिला.त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. 

 

Web Title: Ishrat Jahan's two children missing from triple divorce case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.