निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:34 IST2025-08-19T18:32:41+5:302025-08-19T18:34:02+5:30
मृत तलाल अब्दो मेहदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफी देण्यास तयार नाही. तलालच्या भावाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून येमेन सरकारकडे निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
निमिषा प्रियाला शिक्षेपासून वाचवण्यासाठी येमेनमध्ये प्रयत्न सुरू आहेत. केरळमधील एका उलेमानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि येमेनमधील त्यांच्या संपर्कांचा वापर करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही मृत तलाल अब्दो मेहदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफ करण्यास तयार नाही. तलालच्या भावाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून येमेन सरकारकडे मागणी केली आहे. यामध्ये 'निमिषा प्रियाला लवकरात लवकर मृत्युदंड देण्यात यावा', अशी मागणी केली आहे. मी आपल्या भावाच्या रक्ताचा व्यापार करू शकत नाही, असंही म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर निमिषा प्रियाच्या नावाने फसवणूक करून एक नवीन दावा केला जात आहे. एवढेच नाही तर हा दावा ख्रिश्चन धर्मोपदेशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ए.के. पॉल यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आला आहे. सेव्ह निमिषा प्रियाच्या नावाने एक पोस्टर डिझाइन करण्यात आले आहे. 'तुम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या खात्यात पैसे जमा करू शकता जेणेकरून निमिषा प्रियाला वाचवता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
'निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी थेट भारत सरकारच्या बँक खात्यात दान करा. आम्हाला ८.३ कोटी रुपयांची गरज आहे, असंही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले
या बनावट दाव्यात एक खाते क्रमांक देखील देण्यात आला आहे, हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहे. हे बँक खाते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे खाते असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणातील सत्य सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे बनावट असल्याचे म्हटले आहे. अशा कोणत्याही सापळ्यात अडकू नका, असंही म्हटले आहे. 'हा लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर सरकारी खात्यात देणगी देण्याचे आवाहन खोटे आहे. सरकारने असे कोणतेही आवाहन केलेले नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे देणगी देण्याची आवश्यकता नाही, असं एक्सवर परराष्ट्र मंत्रालयाच्या फॅक्ट चेकने म्हटले आहे.
We have seen claims being made on social media seeking monetary contributions into a GoI designated bank account in the Nimisha Priya case. This is a fake claim.https://t.co/stxeFevl64pic.twitter.com/4gQGIO4gvP
— MEA FactCheck (@MEAFactCheck) August 19, 2025