रेल्वे स्टेशनवर टॉयलेटला जाणं पडलं महागात; IRCTC ने जीएसटीसह वसूल केले 112 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 13:11 IST2022-09-03T13:10:42+5:302022-09-03T13:11:06+5:30
Indian Railway : पर्यटकांना एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर चांगलाच महागात पडला आणि जेव्हा हे प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी आयआरसीटीसीचा (IRCTC) कोणताही दोष नसल्याचे सांगितले.

रेल्वे स्टेशनवर टॉयलेटला जाणं पडलं महागात; IRCTC ने जीएसटीसह वसूल केले 112 रुपये
नवी दिल्ली : तुम्ही कधीतरी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या टॉयलेटचा वापर केला असेल आणि त्यासाठी तुम्ही 5 ते 10 रुपये शुल्क देखील भरले असेल. मात्र, आता यासंबंधित एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, आग्रा कॅंट स्टेशनवरील एक्झिक्युटिव्ह लाउंजचे टॉयलेट काही मिनिटांसाठी वापरण्याच्या बदल्यात, ब्रिटीश दूतावास नवी दिल्लीतून आलेल्या दोन पर्यटकांना 112-112 म्हणजेच 224 रुपये मोजावे लागले आहेत.
किती टक्के जीएसटी आकारला जातो
6 टक्के जीएसटी आणि 6 टक्के सी जीएसटी भरलेल्या रकमेत समावेश आहे. म्हणजेच टॉयलेटला जाण्यासाठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. आत्तापर्यंतची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये टॉयलेटमध्ये जाणे देखील एखाद्यासाठी इतके महाग असल्याचे समोर आले आहे.
आयआरसीटीसीने काय सांगितले?
पर्यटकांना एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर चांगलाच महागात पडला आणि जेव्हा हे प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी आयआरसीटीसीचा (IRCTC) कोणताही दोष नसल्याचे सांगितले. हे एक्झिक्युटिव्ह लाउंज आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये राहण्यासाठी 50 टक्के सूट दिल्यानंतर किमान 112 रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे. आयआरसीटीसीनुसार, पैसे भरल्यानंतर तुम्हाला लाउंजमध्ये कंप्लिमेंट्रिटी म्हणून कॉफी दिली जाते. यामध्ये तुम्ही टॉयलेट वापरू शकता. मोफत वायफाय वापरू शकता. पेमेंट केल्यावर तुम्ही एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये 2 तासांपर्यंत राहू शकता.
याआधीही सेवा शुल्कामुळे चर्चेत
आयआरसीटीसी आपल्या सेवा शुल्कामुळे पहिल्यांदाच चर्चेत नाही. यापूर्वी भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये 20 रुपयांच्या कपवर एका व्यक्तीकडून 50 रुपये सेवा शुल्क घेतले होते. त्या व्यक्तीला एका कप चहासाठी 70 रुपये मोजावे लागले. रेल्वेच्या या 'हायफाय' सेवेचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीने चहाचे बिल सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यानंतर रेल्वेला स्पष्टीकरण म्हणून आपले निवेदन जारी करावे लागले होते.