अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी घेतली जयशंकर यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:31 IST2026-03-06T16:30:34+5:302026-03-06T16:31:02+5:30

मागील चोवीस तासात तीन वेळा संपर्क; नेमकी काय चर्चा झाली?

Iran's Deputy Foreign Minister met Jaishankar, what exactly was discussed? | अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी घेतली जयशंकर यांची भेट

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी घेतली जयशंकर यांची भेट

Iran US War: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इराणमधील राजनैतिक संपर्क वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तीन वेळा संपर्क झाला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी (6 मार्च) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या रायसीना डायलॉग दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

24 तासांत तिसरा राजनैतिक संपर्क

यापूर्वी गुरुवारी (5 मार्च) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्याच दिवशी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात गेले होते. येथे इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत त्यांनी सहभाग घेतला आणि शोकसंदेश नोंदवहीत स्वाक्षरी केली.

खातिबजादेह यांची ट्रम्प प्रशासनावर टीका

इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह सध्या नवी दिल्लीमध्ये उपस्थित असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अमेरिकेच्या धोरणावर टीका केली. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कचे महापौर निवडू शकत नाहीत, मग ते इराणचा सर्वोच्च नेता कसा निवडू शकतात? त्यांनी पुढे अमेरिकेच्या भूमिकेला ‘औपनिवेशिक दृष्टीकोन’ असे संबोधले आणि इराणमधील लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा आरोप केला.

IRIS डेना जहाज बुडाल्याबद्दल प्रतिक्रिया

खातिबजादेह यांनी हिंद महासागरात बुडालेल्या IRIS डेना या इराणी नौदलाच्या जहाजाबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या जहाजावर कोणतीही शस्त्रे नव्हती. या घटनेत सरावासाठी आलेल्या काही तरुण इराणी नौसैनिकांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

इराण-अमेरिका संघर्षावर भारताची भूमिका

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. इराणने यूएई आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांवर हल्ले केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. तसेच, लष्करी संघर्ष कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही, असे म्हटले होते.

Web Title : अमेरिका-ईरान तनाव के बीच ईरानी उप विदेश मंत्री ने जयशंकर से मुलाकात की

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच भारत-ईरान में राजनयिक संपर्क बढ़ा। ईरानी उप विदेश मंत्री ने रायसीना डायलॉग में अमेरिकी नीतियों की आलोचना की। भारत ने तटस्थ रुख बनाए रखा, शांतिपूर्ण समाधान की वकालत की। हाल ही में ईरानी नौसेना की घटना पर चर्चा हुई।

Web Title : Amid US-Iran Tensions, Iranian Deputy FM Meets Jaishankar

Web Summary : Amid rising US-Iran tensions, diplomatic contact between India and Iran increases. Iranian Deputy FM criticizes US policies during Raisina Dialogue. India maintains neutral stance, advocating peaceful solutions. Recent Iranian naval incident discussed.