मोठी बातमी! होर्मुझ पार केले...; 94 हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 20:57 IST2026-03-29T20:56:12+5:302026-03-29T20:57:47+5:30
Iran-US-Israel : देशातील सर्व पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

मोठी बातमी! होर्मुझ पार केले...; 94 हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना
Iran-US-Israel : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. इराणच्या ताब्यात असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतूकीवरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशा तणावाच्या परिस्थितीत भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत.
दोन एलपीजी जहाजे भारताकडे
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, BW TYR आणि BW ELM, ही दोन एलपीजी जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताकडे येत आहेत. BW TYR जहाज 31 मार्च रोजी मुंबईत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर BW ELM जहाज 1 एप्रिल रोजी न्यू मंगळुरू येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. या जहाजांमुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होणारा संभाव्य परिणाम टळण्याची शक्यता आहे.
Two LPG carriers carrying combined LPG cargo of about 94,000 MT enroute India: Govt
— ANI Digital (@ani_digital) March 29, 2026
Read @ANI Story | https://t.co/hRwTJrBYqZ#India#LPG#carriers#BWTYR#BWELMpic.twitter.com/Z1nLiSGK5n
भारतीय जहाजे आणि नाविकांसाठी 24 तास निगराणी
सरकारने या भागात कार्यरत भारतीय जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांबाबत कोणतीही घटना घडलेली नाही. सध्या पश्चिम पर्शियन आखात क्षेत्रात 18 भारतीय ध्वज असलेली जहाजे, तर 485 भारतीय नाविक कार्यरत आहेत. डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग (DG Shipping) जहाज मालक, RPSL एजन्सी आणि भारतीय दूतावासांसोबत समन्वय साधून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहे.
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा
दरम्यान, सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. युरिया कारखान्यांना गॅस पुरवठा मागील सहा महिन्यांच्या सरासरीच्या 70 ते 75 टक्के दरम्यान स्थिर ठेवण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त एलएनजी आणि आरएलएनजीची व्यवस्था करण्यात येत आहे.
भारतीय नौदल सज्ज
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते आणि जागतिक तेल वाहतुकीचा मोठा भाग या मार्गावरून होतो. त्यामुळेच होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.