सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:50 IST2025-10-13T19:50:04+5:302025-10-13T19:50:55+5:30
IPS Puran Kumar Suicide Case: वरिष्ठ IPS अधिकारी वाय पूरन कुमार यांनी आत्महत्येपूर्वी अनेक अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे आरोप केले आहेत.

सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
IPS Puran Kumar Suicide Case: हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने केवळ पोलीस प्रशासनालाच नव्हे, तर राजकीय वर्तुळालाही हादरा दिला आहे. घटनेला सात दिवस उलटूनही त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम झालेले नाही. त्यांच्या पत्नी IAS अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी पोस्टमॉर्टेमपूर्वी हरियाणाचे DGP शत्रुजीत कपूर व अन्य 15 अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
सात दिवस उलटले, तरीही पोस्टमॉर्टेम नाही
पूरन कुमार यांनी मृत्यूपूर्वी एका चिठ्ठीतून हरियाणाच्या DGP सह 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप केले होते. त्यामुळे ही घटना आता केवळ आत्महत्येची नसून ‘सिस्टम विरुद्ध’ची लढाई झआली आहे. सात दिवस उलटून गेले तरीही IPS वाय. पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम झालेले नाही. त्यांची पत्नी अमनीत पी. कुमार यांचा दावा आहे की, ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या आहे. त्या DGP शत्रुजीत कपूर आणि अन्य आरोपींना अटक होईपर्यंत पोस्टमॉर्टेमला परवानगी देणार नाहीत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
आत्महत्या की कटकारस्थान?
७ ऑक्टोबर रोजी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगड सेक्टर-११ मधील निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी पत्नी अमनीत, मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर होत्या. घटनेची बातमी मिळताच त्या भारतात परत आल्या. माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये पूरन कुमार यांनी हरियाणाच्या DGPसह १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहिली असून, त्यांच्यावर मानसिक त्रास आणि छळाचे आरोप आहेत.
कौटुंबिक विरोधामुळे चौकशी ठप्प
कुटुंबाकडून पोस्टमॉर्टेमला परवानगी न मिळाल्याने चौकशी पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंदीगड पोलिसांच्या SIT ला अद्याप पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि मृताचा लॅपटॉप मिळालेला नाही. कुटुंबाने तो लॅपटॉप स्वतःजवळ ठेवला आहे. तपास यंत्रणेनुसार, त्या लॅपटॉपवरील फिंगरप्रिंट, ईमेल ट्रेल आणि डेटा यावरून मृत्यूची परिस्थिती समजू शकते. मात्र, पत्नीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
SITची चौकशी पोस्टमॉर्टेमवर अवलंबून
चंदीगड पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने (SIT) स्पष्ट केले आहे की, पोस्टमॉर्टेमशिवाय चौकशी पुढे जाऊ शकत नाही. वैद्यकीय अहवालाशिवाय ना मृत्यूचे कारण निश्चित करता येईल, ना सुसाईड नोटची खात्री देता येईल. कुटुंबाने सहमती दिली नाही, तर पोलिस मजिस्ट्रेटच्या उपस्थितीत कायदेशीररीत्या पोस्टमॉर्टेम करू शकतात, जेणेकरून पुरावे नष्ट होणार नाहीत.
गनपावडर आणि बॅलिस्टिक पुरावे धोक्यात
सहा दिवस उलटल्याने गनपावडरचे अवशेष आणि बॅलिस्टिक पुरावे नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. SITने म्हटले की, उशिरा पोस्टमॉर्टेम झाल्यास गोळी व शस्त्रासंबंधी तपासावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, SITला वाय. पूरन कुमार यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्समधून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. घटनेच्या काही तास आधी त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकारी, एका वकिलाशी आणि काही ओळखीच्या व्यक्तींशी संवाद साधला होता. SIT आता त्या सर्वांची चौकशी करणार आहे.