जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 23:30 IST2025-10-11T23:30:26+5:302025-10-11T23:30:51+5:30
IPS Puran Kumar Death Case: आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याच्या घटनेमुळे सध्या हरयाणातील शासन आणि प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, पुरन कुमार यांना जोपर्यत न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशी भूमिका त्यांच्या पत्नी अवनीत पी. कुमार आणि कुटुंबीयांनी घेतली आहे.

जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याच्या घटनेमुळे सध्या हरयाणातील शासन आणि प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, पुरन कुमार यांना जोपर्यत न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशी भूमिका त्यांच्या पत्नी अवनीत पी. कुमार आणि कुटुंबीयांनी घेतली आहे.
पुरन कुमार यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास परवानगी देण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. ‘’पुरन कुमार यांचा मृतदेह आम्हाला न कळवता सेक्टर १६ येथील सरकारी रुग्णालयातून पीजीआयएमईआय येथे नेण्यात आलं आहे. हा आमच्यावर अन्याय आहे’, अशी भूमिका पुरन कुमार यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. तर आम्हाला न विचारला मृतदेह नेण्यात आला असा आरोपू पुरन कुमार यांचे नातेवाईक आणि पंजाबमधील आमदार अमित रतन यांनी केला आहे. हरयाणामधील रोहतक येथे कर्तव्यावर असलेले २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी वाय. पुरन सिंह यांनी मंगळवारी स्वत:च्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं होतं.
आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये हरयाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर, रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांच्यासह आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर जातीभेद आणि मानसिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे पुरन कुमार यांच्या मृत्यूनंतर हरयाणातील प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हरयाणा सरकारने रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी सुरिंदर सिंह भोरिया यांना रोहतकचे नवे एसपी बनवण्यात आलं आहे. तर या प्रकरणी निष्पक्षपणे तपास केला जाईल, असे हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी सांगितले आहे. तसेच दोषी कितीही मोठा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.