IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 18:36 IST2025-08-10T18:34:34+5:302025-08-10T18:36:06+5:30
निवृत्त आयपीएस वडील न्यायालयीन सुनावणी हरले असले तरी, त्यांनी तो आपला विजय मानला.

IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
आयपीएस अधिकाऱ्यांनी एका कॉन्स्टेबलला २०२३ मध्ये नोकरीवरुन बडतर्फ केले. त्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलीनेच त्या कॉन्स्टेबलची केस लढवली. त्या केसमध्ये कॉन्स्टेबलला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आपल्या वडिलांना कोर्टात प्रश्न विचारत त्या मुलीने कोर्टात वडिलांना हरवल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील आहे.
आयपीएस यांनी केलेल्या कारवाईला कॉन्स्टेबलने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होती. या प्रकरणी मागील काही वर्षापासून सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनाही न्यायालयात हजर राहावे लागले.
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
जानेवारी २०२३ चा हा खटला बरेली रेंजमध्ये आयजी असलेले राकेश सिंह आणि त्यांची वकील मुलगी अनुरा सिंह यांच्याशी संबंधित आहे. राकेश सिंह आता उत्तर प्रदेश पोलिसातून निवृत्त झाले आहेत.
त्रिवेणी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या १७ वर्षीय मुलीने कॉन्स्टेबल तौफिक अहमदवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. पीडितेच्या वडिलांनी पोक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयाने कॉन्स्टेबलला निर्दोष सोडले. त्यानंतर त्यांनी बडतर्फीचा आदेश रद्द करण्यासाठी अर्ज केला. ते तत्कालीन आयजी राकेश सिंह यांनी फेटाळले. याविरुद्ध तौफिक अहमद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी त्यांचे वकील पत्र अनुरा सिंह यांना त्यांचे दिले.
अनुरा सिंह यांनी त्यांचे निवृत्त वडील राकेश सिंह यांनाही स्पष्टीकरणासाठी न्यायालयात बोलावले. त्यांनी या प्रकरणात विभागीय तपासातील त्रुटी आणि केलेल्या कारवाईबद्दल न्यायालयाला सांगितले. अनुरा सिंह म्हणाल्या की, कॉन्स्टेबल तौफिक यांना बडतर्फ करताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. दुसरीकडे, अनुरा यांचे वडील राकेश सिंह यांनी त्यांची बाजू मांडत म्हटले की, विभागाची कारवाई योग्य आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने विभागीय कारवाई रद्द केली. बरेली पोलिसांना तौफिक यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले.
आयपीएस अधिकाऱ्यांनी वकील मुलीचे केले कौतुक
निवृत्त आयपीएस अधिकारी राकेश सिंह यांनी या न्यायालयीन सुनावणीत पराभव पत्करला असला तरी, त्यांनी हा आपला विजय मानला आहे. ते म्हणाले की, त्यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली आणि त्यांना अभिमान आहे की त्यांच्या मुलीनेही तिचे काम चांगले केले आणि तिची बाजू मांडली. हा कोणत्याही वडिलांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असेही ते म्हणाले.