"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:46 PM2024-11-29T23:46:11+5:302024-11-29T23:48:58+5:30
"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..."
मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले.
संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "पंजा खूनी झाला आहे, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ एका निष्पाप गायीला गोळी घालण्यात आली. जे लोक अहिंसेवर बोलत आहेत, त्यांच्याच राजवटीत हे होत आहे."
हिंदू एकात्मता ही काळाची गरज -
ही घटना हिंदू संस्कृती आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे संत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही केला. हिंदू एकात्मता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही पदयात्रा केवळ सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ही यात्रा म्हणजे, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत -
संत रामभद्राचार्य यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा अपमान करतात. गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे.