इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्राध्यापकाला हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:28 IST2025-01-28T12:07:01+5:302025-01-28T12:28:08+5:30
इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इतर १७ जणांवर एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्राध्यापकाला हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप
Kris Gopalakrishnan: कर्नाटक पोलिसांनीइन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक बलराम यांच्यासह अन्य १६ जणांविरुद्ध एससी/एसटी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ७१ व्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार सदाशिव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपालकृष्णन यांच्याकडून कोणतीही दिलेली नाही. मात्र इन्फोसिसचे सहसंस्थापक गोपालकृष्णन या प्रकरणात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार दुर्गाप्पा हे आदिवासी बोवी समाजाचे असून ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी मेंबर होते. २०१४ मध्ये हनी ट्रॅपच्या खोट्या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा दुर्गाप्पा यांनी केला होता. या प्रकरणात अडकल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आपल्याला जातीवरुन शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.
दुर्गाप्पा यांनी आयआयएससीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य गोपालकृष्णन आणि इतर अनेक प्राध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप केला. एफआयआरमध्ये आयआयएससीचे संचालक गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर आणि संद्या विश्वेश्वरैह यांच्यासह इतर प्रमुख शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत.
दुर्गाप्पा यांच्या तक्रारीत आयआयएससीमधील वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासकांकडून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. माझे पद आणि विश्वासार्हता कमी करण्यासाठी मला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचा दावा दुर्गाप्पा यांनी केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती आणि जमातींवरील गुन्ह्यांसाठी एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा कडक आहे आणि दोषी आढळल्यास तुरुंगवासासह कठोर शिक्षा होऊ शकते.
इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी २००७ ते २०११ पर्यंत कंपनीचे संचालक आणि २०११ ते २०१४ पर्यंत उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले गोपालकृष्णन यांनी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष आणि दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाचे सह-अध्यक्ष अशा प्रतिष्ठित भूमिका निभावली होती. यासोबत गोपालकृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रिस हे इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअर्सचे सहकारी आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स संस्थेचे मानद सहकारी आहेत.