बंगालमधील घुसखोर इतर राज्यांमध्येही पसरत आहेत; हिमंता सरमा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 08:50 IST2026-04-26T08:50:05+5:302026-04-26T08:50:46+5:30

निवडणुकीत प्रत्येक भारतीयांचे हितसंबंध, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी ११० जागांवर भाजप विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला.

Infiltrators from Bengal are spreading to other states too; Himanta Sarma alleges | बंगालमधील घुसखोर इतर राज्यांमध्येही पसरत आहेत; हिमंता सरमा यांचा आरोप

बंगालमधील घुसखोर इतर राज्यांमध्येही पसरत आहेत; हिमंता सरमा यांचा आरोप

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक भारतीयाचा हितसंबंध गुंतलेला आहे; कारण बांगलादेशी घुसखोरांमुळे केवळ या राज्यातील लोकसंख्याशास्त्रीय रचनेत बदल होत आहे असे नव्हे, तर हे घुसखोर आता इतर राज्यांमध्येही पसरत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी नमूद केले. 

आसाममधील १२६ जागांपैकी १०० हून अधिक जागा भाजप जिंकेल; तसेच पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी ११० जागांवर भाजप विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये भाजपने २०० हून अधिक जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटायला नको. पहिल्या टप्प्यात सुमारे ९३ टक्के मतदान झाले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तिथे आता भीतीचे वातावरण नाही. या भीतीपोटीच लोक मतदानासाठी बाहेर पडत नसत, असे सरमा यांनी सांगितले.

ही अस्तित्वाची लढाई
पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही केवळ एका राज्याची निवडणूक नसून संपूर्ण देशासाठी विशेषतः देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांसाठी सांस्कृतिक आणि नागरी अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली एक लढाई आहे, असे आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

घुसखोरी थांबली नाही तर...
बंगालमध्ये जनतेने भाजप सरकार निवडून  दिले नाही तर अनियंत्रित घुसखोरीमुळे हे राज्य बांगलादेशचाच एक विस्तार ठरण्याचा धोका आगामी काळात असेल, असे सरमा यांनी सांगितले. एकदा बदललेली लोकसंख्या शास्त्रीय रचना पुन्हा पूर्ववत करणे फार कठीण आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Infiltrators from Bengal are spreading to other states too; Himanta Sarma alleges