व्याजाने पैसे देणं, ३ घरं, ३ रिक्षा, कार; करोडपती भिकाऱ्याचा पर्दाफाश, मांडली स्वत:ची बाजू, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 09:57 IST2026-01-19T09:56:06+5:302026-01-19T09:57:30+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, रिक्षा आणि कार असल्याचं समोर आलं आहे.

indore millionaire beggar mangilal property case lending money on interest three house auto one car | व्याजाने पैसे देणं, ३ घरं, ३ रिक्षा, कार; करोडपती भिकाऱ्याचा पर्दाफाश, मांडली स्वत:ची बाजू, म्हणाला...

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, रिक्षा आणि कार असल्याचं समोर आलं आहे. मांगीलाल असं या भिकाऱ्याचं नाव आहे. महिला व बालविकास विभागाच्या बचाव पथकाने सराफा बाजार परिसरात कारवाई करत मांगीलालला ताब्यात घेतलं, तेव्हा ही धक्कादायक माहिती उघड झाली.

असा करायचा लोकांची दिशाभूल 

सराफा बाजार परिसरात येणारा प्रत्येक व्यक्ती मांगीलालला ओळखत असे. लाकडी गाडी, पाठीवरची पिशवी आणि हातातील चपलांच्या साहाय्याने फरफटत चालणं, हे दृश्य पाहून कोणालाही त्याची दया येत असे. मांगीलाल स्वतःला अत्यंत असहाय आणि हतबल दाखवत असे. तो कोणाकडेही जबरदस्ती करत नसे किंवा मोठ्या आवाजात बोलत नसे, त्यामुळे त्याची शारीरिक स्थिती पाहून लोक स्वतःहून त्याला पैसे द्यायचे.

शासकीय मदतीचाही घेतला लाभ 

तपासणीत असं समोर आलं की, मांगीलालच्या अपंगत्वामुळे शासनाने त्याला रेडक्रॉस सोसायटीमार्फत यापूर्वीच १ बीएचके घर उपलब्ध करून दिले होते. तो काही काळ आश्रमातही राहिला होता. मात्र, सुख-सुविधा असूनही त्याने भीक मागणंच आपला व्यवसाय म्हणून सुरू ठेवले. रेस्क्यू टीमने जेव्हा मांगीलालच्या मालमत्तेची चौकशी केली, तेव्हा मोठे खुलासे झाले.

३ घरं, ३ रिक्षा, कार

भगतसिंग नगरमध्ये १६×४५ फुटांची तीन मजली इमारत, शिवनगर भागात ६०० स्क्वेअर फुटांचं दुसरं घर आणि अलवास भागात १ बीएचके घर. या मालमत्तांची किंमत आजच्या बाजारभावानुसार कोट्यवधींच्या घरात आहे. मांगीलालकडे स्वतःच्या तीन रिक्षा आहेत, ज्या त्याने भाड्याने चालवायला दिल्या आहेत. इतकंच नाही तर त्याच्याकडे एक 'डिझायर' कार देखील आहे, जी तो स्वतः वापरण्याऐवजी भाड्याने देऊन त्यातून कमाई करतो.

भीक मागण्यासोबतच सावकारीचा धंदा 

चौकशीदरम्यान मांगीलालने कबूल केलं की, त्याने सराफा बाजार परिसरातील अनेक लोकांना व्याजाने पैसे दिले आहेत. तो रोज सराफा बाजारात फक्त भीक मागण्यासाठी नाही, तर व्याजाची वसुली करण्यासाठी देखील जात असे. भीक आणि व्याज मिळून तो दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमवत असे.

मांगीलालने मांडली स्वतःची बाजू 

बचाव पथकाच्या कारवाईदरम्यान मांगीलालने स्वतःची बाजू मांडताना सांगितलं की, तो कोणाकडेही जबरदस्ती करत नाही, लोक स्वतःहून पैसे देतात. मात्र, प्रशासनाच्या मते, संपन्न असूनही खोटा असहायपणा दाखवून भीक मागणं हा गुन्हा आहे. नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितलं की, मांगीलाल विरुद्ध सतत तक्रारी मिळत होत्या, त्या आधारावर भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : करोड़पति भिखारी का पर्दाफाश: घर, रिक्शा, कार, और उधार का कारोबार!

Web Summary : इंदौर में एक विकलांग भिखारी के पास घर, रिक्शा और कार होने का खुलासा हुआ। सहानुभूति का फायदा उठाकर, वह उधार का कारोबार भी चलाता था, और भीख और ब्याज से रोजाना कमाता था।

Web Title : Millionaire beggar exposed: Houses, rickshaws, car, and lending business!

Web Summary : A disabled beggar in Indore, possessing houses, rickshaws, and a car, was exposed. He exploited sympathy, also running a lending business, earning daily from begging and interest.