मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:55 IST2026-01-09T14:55:27+5:302026-01-09T14:55:35+5:30
सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या 'एमवाय' रुग्णालयातील पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे.

मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
इंदूरमधील राज्याच्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या 'एमवाय' रुग्णालयातील पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. येथील 'उंदीर प्रकरणा'नंतर आता चेस्ट वॉर्डमध्ये नर्सच्या चुकीमुळे एका दीड महिन्याच्या बालकाचा अंगठा कापला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
बेटमा येथील एका बालकाला न्यूमोनियाच्या उपचारासाठी चेस्ट वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बाळाच्या हाताला लावलेला टेप नर्स कात्रीने कापत होती. त्याचवेळी निष्काळजीपणामुळे कात्री बाळाच्या अंगठ्याला लागली आणि त्याचा अंगठा कापला गेला. या घटनेनंतर वॉर्डमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सने कामात प्रचंड हलगर्जीपणा केल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनावर केला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित नर्सला निलंबित केलं आहे. याचबरोबर तीन नर्सिंग इंचार्जचा पगार रोखण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर बाळाला तातडीने इंदूरच्या 'सुपर स्पेशालिटी' रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे सर्जनच्या टीमने शस्त्रक्रिया करून कापलेला अंगठा यशस्वीरित्या पुन्हा जोडला आहे.
एमजीएम मेडिकल कॉलेजच्या डीननी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. एमवाय रुग्णालय वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नर्सरी वॉर्डमध्ये नवजात बाळांना उंदीर चावल्याच्या घटनेमुळे देशभरात या रुग्णालयावर टीकेची झोड उठली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे रुग्णालयातील रुग्णांची, विशेषतः लहान मुलांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.