भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 11:30 IST2025-10-26T11:29:28+5:302025-10-26T11:30:15+5:30
इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढल्याची लज्जास्पद घटना घडली आहे.

भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
इंदूर- ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025 दरम्यान इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंची छेड काढणाऱ्या अकील खान उर्फ नायट्रा या आरोपीची क्राइम कुंडली समोर आली आहे. सुरुवातीला अकील खान भुरटा वाटला होता, पण पोलिस तपासात तो सामान्य आरोपी नाही, तर शहरातील कुख्यात गु्न्हेगार असल्याचे समोर आले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अकीलचा सहभाग होता.
ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंसोबत नेमकं काय घडलं?
सध्या भारतात महिला विश्वचषक आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन स्टार महिला खेळाडू मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका हॉटेलमधून बाहेर पडत होत्या. त्यावेळी अकीलने त्यांच्या दिशेने अश्लील वर्तन आणि 'बॅड टच' केले. या घटनेमुळे खेळाडू स्तब्ध झाल्या आणि शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड
तपासात उघड झाले की, अकील खान उर्फ नायट्रा याच्यावर पूर्वीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, दबावाने पैसे उकळणे, ड्रग्ज तस्करी आणि अवैध दारू व्यापार अशाप्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार, अकील अनेक वेळा तुरुंगात जाऊन आला आहे आणि अलीकडेच जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले असते, तर ही लज्जास्पद घटना टाळता आली असती.
पुढील कारवाई
या घटनेनंतर इंदूर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेतील त्रुटी देशाच्या प्रतिमेस धक्का पोहोचवणारी आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिसांनी अकीलच्या जुन्या प्रकरणांची पुनर्तपासणी सुरू केली आहे. प्रशासनानेही विदेशी खेळाडूंसाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.