हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:41 IST2025-09-11T11:37:16+5:302025-09-11T11:41:11+5:30
एका खासगी शाळेत सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय लक्षिता पटेलची तब्येत बिघडली.

हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
इंदूरमधील बेतमा परिसरात बुधवारी दुपारी दुःखद घटना घडली. एका खासगी शाळेत सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय लक्षिता पटेलची तब्येत बिघडली. शाळेच्या मैदानात मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या लक्षिताला अचानक थकल्यासारखं वाटायला लागलं. ती काही वेळ तिथेच बसली. पण नंतर अचानक जमिनीवर कोसळली.
घटनेची माहिती मिळताच क्रीडा शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी लक्षिताला ताबडतोब उपचारासाठी बेटमा रुग्णालयात नेलं. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी कार्डिएक अरेस्ट असल्याचं म्हटलं. तिला चांगल्या उपचारांसाठी इंदूरच्या चोईथराम रुग्णालयात रेफर करण्यात आलं. विद्यार्थिनीला दुपारी ३ वाजता चोईथराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणीनंतर कार्डिएक अरेस्ट आल्याची पुष्टी केली आणि लगेच उपचार सुरू केले. विद्यार्थिनीला वाचवण्याचे प्रयत्न सुमारे दोन तास सुरू राहिले. पण संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लक्षिताचा मृत्यू झाला. लक्षिता अभ्यासात खूप हुशार होती. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षिताचे वडील दिलीप पटेल एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना एक मोठा मुलगा आहे, जो बिजलपूर येथे त्यांच्या मामाच्या घरी राहतो. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबातील सदस्य दुःखी झाले. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.