IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:55 IST2025-12-08T09:55:14+5:302025-12-08T09:55:51+5:30
इंडिगोमुळे देशभरातील हजारो प्रवाशांना गेल्या सात दिवसांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या शेकडो विमानांच्या रद्द होण्यामुळे आणि विलंबाने उड्डाणामुळे निर्माण झालेल्या संकटावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या संकटामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना गेल्या सात दिवसांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत प्रवाशांसाठी तातडीने हस्तक्षेप आणि महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत, ज्यावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.
प्रवाशांच्या त्रासावर कोर्टाने तातडीने लक्ष द्यावे!
इंडिगोच्या १,००० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचिकाकर्ते नरेंद्र मिश्रा यांनी या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन, 'मानवी संकट' निर्माण झाल्याचा दावा केला आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी आणि तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी काय?
"फ्लाइट रद्द झाल्यामुळे किंवा विलंबाने गेल्यामुळे ज्या प्रवाशांना प्रचंड त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी तातडीने पर्यायी प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी."
'अनुच्छेद २१' चे उल्लंघन? पायलट नियमांमुळे अडचण
याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करणे, हे नागरिकांच्या 'जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे' म्हणजेच संविधानातील अनुच्छेद २१चे थेट उल्लंघन आहे.
या संकटाचे मूळ कारण इंडिगोने लागू केलेले नवीन फ्लाइट ड्यूटी टाईम लिमिटेशन हा नियम व्यवस्थितपणे न आखल्यामुळे झाले आहे. म्हणजेच, वैमानिकांना पुरेशी विश्रांती देण्यासाठी असलेले नियम लागू करताना कंपनीने नियोजनाचा अभाव दाखवला, ज्यामुळे हे संकट ओढवले.
सर न्यायाधीशांच्या निवासस्थानी धाव, त्वरित सुनावणीची मागणी
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन, याचिकाकर्त्यांचे वकील ६ डिसेंबर रोजी थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी तातडीने या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती केली. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेआय यांनी याचिका पाहिली आणि तातडीने कार्यवाहीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.
सीजेआय यांच्याकडून लवकर सुनावणीचे आश्वासन मिळाल्यानंतर आज या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे देशभरातील लाखो त्रस्त प्रवाशांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्ट प्रवाशांना दिलासा देण्यासाठी काय आदेश देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.