इंडिगोच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी, आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:40 IST2026-01-30T15:06:43+5:302026-01-30T15:40:03+5:30
कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला अपहरण करण्याची धमकी मिळाली. यामुळे आज दुपारी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

इंडिगोच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी, आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ
कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाला बॉम्बची धमकी मिळाली. धमकी मिळताच, विमान अहमदाबादला वळवण्यात आले आणि त्यानंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीत ही धमकी सापडली, यामध्ये विमानाचे अपहरण करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
विमानात असलेल्या सर्व १८० प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रवाशाकडे संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. सध्या संपूर्ण विमानाची तपासणी केली जात आहे.
टिश्यू पेपरवर धमकी मिळाली
देशभरात दररोज अशा घटना घडत असतात, अनेकदा शाळांना धमकी मिळाल्या घटना घडल्या आहेत. आज शुक्रवारी इंडिगोच्या एका विमानाला अपहरणाची धमकी मिळाली. विमानातील एका टिश्यू पेपरमध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी आणि अपहरणाची माहिती होती. टिश्यू पेपर सापडल्यानंतर, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
धोक्याची माहिती मिळताच, वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रणाला सूचना दिली आणि विमान अहमदाबादला वळवण्यात आले. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केली. विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर विमान उड्डाण करू शकते.
काही दिवसांपूर्वीच इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी आल्याची तक्रार आली होती. ही माहिती एका टिश्यूवर देखील मिळाली होती. त्यावेळी विमान लखनौमध्ये उतरवण्यात आले होते.