इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 08:50 IST2025-12-06T08:49:35+5:302025-12-06T08:50:29+5:30
IndiGo Flight Crisis: इंडिगो या विमान कंपनीची सेवा कोलमडल्याने देशात मोठं प्रवासी संकट उभं राहिलं आहे. विमानांची हजारो उड्डाणं रद्द झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे.

इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
इंडिगो या विमान कंपनीची सेवा कोलमडल्याने देशात मोठं प्रवासी संकट उभं राहिलं आहे. विमानांची हजारो उड्डाणं रद्द झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. तसेच विशेष ट्रेन आणि काही ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने साबरमती आणि दिल्ली जंक्शनदरम्यान, विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९४९७/०९४९८ ही साबरमती दिल्ली जंक्शन सुपरफास्ट स्पेशल ट्रेन एकूण चार फेऱ्यांमध्ये चालवली जाईल.
इंडिगोच्या विमान सेवेतील घोळामुळे अहमदाबाद येथून दिल्लीदरम्यान, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवास साधने उपलब्ध होत नव्हती. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोईसाठी ट्रेन ऑन डिमांड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुपरफास्ट ट्रेन साबरमती ते दिल्लीदरम्यान धावणार आहे.
ही ट्रेन ७ आणि ९ डिसेंबर रोजी साबरमती येथून रात्री २२.५५ वाजता रवाना होईल. तसेच दुसऱ्या दिवशी दुपारी १५.१५ वाजता दिल्ली जंक्शन येथे पोहोचेल. तर ही ट्रेन ८ आणि १० डिसेंबर रोजी दिल्ली जंक्शन येथून रात्री २१ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता साबरमती येथे पोहोचेल. ही ट्रेन महेसाणा, पालनपूर, आबूरोड, मारवाड जंक्शन, अजमेर, जयपूर, अलवर, रेवाडी, गुडगांव आणि दिल्ली कँट या स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टियर डबे जोडण्यात आले आहेत.
याचप्रमाणे देशभरात मोठ्या प्रमाणावर विमाने रद्द झालेली असल्याने प्रवाशांच्या मागणीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ३७ प्रीमियम ट्रेनमध्ये ११६ अतिरिक्त डबे जोडले आहेत. हे डबे देशाच्या विविध भागांमध्ये ११४ वाढलेल्या ट्रिप्ससह धावणाऱ्या ट्रेनमध्ये लावण्यात आले आहेत.