"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 21:32 IST2025-12-06T21:31:22+5:302025-12-06T21:32:02+5:30
IndiGo Flight Delay, BJP vs MVA: इंडिगोमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय

"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
IndiGo Flight Delay, BJP vs MVA: इंडिगो विमानसेवेचा सावळागोंधळ अद्यापही सुरुच आहे. इंडिगोच्या गचाळ व्यवस्थापनाने गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले आहे. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचे चित्र आहे. विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले. तशातच आता विरोधकही सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
हा गोंधळ म्हणजे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "केंद्रातील भाजपा सरकारने खाजगी कंपन्यांना रान मोकळे करून दिले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण या कंपन्यांवर राहिलेले नाही. प्रवाशांची लूट सुरु आहे. हवाई वाहतूक मंत्री व मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती आहे. इंडिगोचा गोंधळ व प्रवाशांना झालेला प्रचंड त्रास हे भाजपा सरकारचा नाकर्तेपणा व अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे."
सुप्रिया सुळेंचीही टीका
"केंद्र सरकारने इंडिगोवर अँक्शन घ्यायला हवी. ज्या पद्धतीने हजारो लोकांना गेल्या दोन दिवसांत अडचणी आल्या आहेत. आम्ही देखील संसदेत हा सर्व मुद्दा मांडला आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर अॅक्शन घेतली पाहिजे. सध्या इंडिगोच्या प्रवाशांना ज्या काही अडचणी येत आहेत, त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरणही दिलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा नेमकं कसा झाला? आधी कोणतीही सूचना न देता हा विस्कळीतपणा सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये आणि वेळ देखील वाया जात आहे. आम्हाला इंडिगोकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. पण आता केंद्र सरकारने इंडिगो सारख्या आणखी पाच कंपन्या तयार केल्या पाहिजेत. तसेच इंडिगोच्या सेवेला काय अडचणी आल्या आहेत? इंडिगोची सेवा अचानक विस्कळीत का झाली? त्यावर उपाय काय? याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली पाहिजे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारकडून भाडेवाढीला चाप
इंडिगोच्या सध्याच्या संकटानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त, प्रवाशांना जास्त भाडे देण्यापासून रोखण्यासाठी मंत्रालयाने भाडे मर्यादा लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे, जे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू राहतील.