Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:59 IST2025-12-05T17:58:43+5:302025-12-05T17:59:00+5:30
Indigo Crisis : इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय.

Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
Indigo Crisis : देशातील आघाडीची एअरलाइन कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांना आज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरुमधील इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
भावाचा मृत्यू, पण फ्लाइट रद्द झाल्याने...
अचानक फ्लाइट रद्द झाल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. कोणाला इंटरव्ह्यूसाठी जायचे, तर कोणाला ऑफिसमधील अत्यावश्यक कामासाठी. अनेक जण लग्नसमारंभाला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले, तर काहींच्या कुटुंबात आपत्कालीन परिस्थिती उद्धभवली होती. अशातच, मुंबई विमानतळावरील एका प्रवाशाची व्यथा मन हेलावणारी होती.
प्रवाशाने सांगितले की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला असून, मृतदेह दुसऱ्या फ्लाइटने कोलकाता येथे पोहोचला आहे. पण, फ्लाइट रद्द झाल्यामुळे कुटुंबीय मुंबईतच अडकून पडले आहेत. प्रवाशांचे म्हणणे आहे की, त्यांना फ्लाइट रद्द किंवा रीशेड्यूल झाल्याची स्पष्ट माहिती दिली जात नाही. इंटरनॅशनल फ्लाइटने आलेल्या प्रवाशांनाही त्यांच्या बॅगेजबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याचा आरोप आहे.
अनेकांची महत्वाची कामे रखडली...
मुंबई-पटना फ्लाइटची वाट पाहत असलेले कुमार गौरव म्हणाले, मी कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारांसाठी मुंबई आलो होतो. आता त्यांना घेऊन परत पटना जायचे आहे, पण फ्लाइट रद्द झाल्याने आम्ही विमानतळावरच अडकलो आहोत. तर काल रात्री 3 वाजता बोस्टनहून मुंबईत आलेले रोहित यांनी सांगितले की, त्यांना हैदराबादला जायचे होते, पण त्यांची फ्लाइट रद्द झाली आणि त्यांचे बॅगेजही अद्याप मिळालेले नाही.
नेमकी समस्या कुठे? DGCA चा नवा नियम ठरला कारण
इंडिगोने फ्लाइट रद्द करण्याचे कारण म्हणून तांत्रिक बिघाड, खराब हवामान, गर्दी आणि क्रूची कमतरता यांचा उल्लेख केला होता. मात्र खरी समस्या DGCA च्या 1 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या रोस्टर सिस्टममध्ये असल्याचे समोर येत आहे. या नियमांनुसार पायलट आणि क्रू मेंबर्सना अधिक विश्रांती देण्याची बंधने आणली गेली आहेत. या कठोर नियमांनंतर नोव्हेंबर महिन्यातच इंडिगोला 1,232 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या होत्या. भारतातील सर्वाधिक उड्डाणे करणारी एअरलाइन असलेल्या इंडिगोला, फ्लाइट्सची संख्या जास्त आणि क्रू उपलब्धता कमी असल्याने फ्लाइट शेड्यूल व्यवस्थापित करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच आज पुन्हा मोठ्या प्रमाणात फ्लाइट्स रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे.