इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:56 IST2025-12-05T08:32:11+5:302025-12-05T08:56:02+5:30
मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या विमान सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाइनला १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तासनतास उशिराने झाली.

इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
मागील काही दिवसांपासून इंडिगोच्याविमानांचे उड्डाण दोन -दोन तास उशीरा आणि काही विमाने अचानक रद्द करण्यात आल्याची प्रकरण समोर आली. कामकाजाच्या संकटामुळे गुरुवारी प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. विमान कंपनीने देशभरातील ५५० हून अधिक उड्डाणे रद्द केली, यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबादमधील १९१ उड्डाणांचा समावेश आहे. हजारो प्रवाशांना लांब रांगा, वाट पाहणे आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला.
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
डीजीआयसीने इंडिगोवर कारवाई केली आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. कंपनीने सध्याच्या परिस्थितीबद्दल माफी मागितली आहे. लवकरच सामान्य कामकाज पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. "गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. आम्ही सर्व प्रवाशांची आणि भागधारकांची माफी मागतो. आमचे पथक सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी एमओसीए, डीजीसीए, बीसीएएस, एएआय आणि विमानतळ ऑपरेटर्सशी समन्वय साधत आहेत. ग्राहकांना नियमित अपडेट्स दिले जात आहेत आणि त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन केले जात आहे.
नोव्हेंबरमध्ये १,२०० हून अधिक उड्डाणे रद्द
दररोज अंदाजे ३.८ लाख प्रवाशांना सेवा देणारी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल आव्हानांना तोंड देत आहे. इंडिगो रोज अंदाजे २,३०० उड्डाणे चालवते. आकडेवारीनुसार, फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाइनला १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तीन तीन तास उशिराने झाली.
डीजीसीएने फटकारले
कामगिरीतील या घसरणीनंतर, डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले. एअरलाइनला सविस्तर कारणे देण्यास सांगितले. प्रतिसादात, इंडिगोने सांगितले की त्यांच्या १,२३२ उड्डाणांपैकी ७५५ उड्डाणे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे, ९२ एटीसी बिघाडामुळे, २५८ विमानतळ निर्बंधांमुळे आणि १२७ इतर कारणांमुळे रद्द करण्यात आली. डीजीसीएने सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन उपाययोजनांची शिफारस केली आहे.
सोशल मीडियावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली
मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्यामुळे, हजारो प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. व्हिडीओ आणि फोटो शेअर केले, एअरलाइनच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. अनेक प्रवाशांनी तिकिटांचे परतफेड, पुनर्बुकिंगमध्ये विलंब आणि माहितीचा अभाव याबद्दल तक्रारी केल्या. दरम्यान, इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्ट यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
हा ईमेल सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांनी लिहिले, "आम्ही दररोज ३.८ लाख प्रवाशांना सेवा देतो आणि प्रत्येक ग्राहकाला चांगला अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या काही दिवसांत आम्ही हे वचन पूर्ण करू शकलो नाही आणि आम्ही याबद्दल जाहीरपणे माफी मागतो."
त्यांनी ऑपरेशनल संकटाची कारणे सांगितली. यामध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड, वेळापत्रकात बदल, खराब हवामान, विमान वाहतूक व्यवस्थेतील गर्दी आणि नवीन FDTL नियमांचा परिणाम यांचा समावेश होता.