इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:36 IST2025-12-04T11:34:41+5:302025-12-04T11:36:34+5:30
Indigo flights cancelled: क्रू मेंबर्सची कमतरता, समस्येमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय

इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Indigo flights cancelled: भारतीय विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. देशभरातील अनेक विमानतळांवर त्यांची विमान उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. तशातच आज, गुरुवारी १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. काही उड्डाणे तांत्रिक समस्यांमुळे प्रभावित झाली, तर काहींना क्रू मेंबर्सची कमतरता भासत असल्याचे कारण ठरले. इंडिगोच्या या समस्येमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे.
अनेक विमान उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्द
इंडिगोच्या विमानाचे बुकिंग केलेले अनेक प्रवासी बराच वेळ विमानतळावर विमानांची वाट पाहत थांबलेले दिसले. पण शेवटच्या क्षणी त्यांची विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे समजले. गुरुवारी हैदराबाद आणि दिल्ली विमानतळांवर लांब रांगा दिसून आल्या. त्यामुळे एअरलाइनच्या चुकीबद्दल लोक आता सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. इंडिगो व्यतिरिक्त, इतर अनेक विमान कंपन्या अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाचे भाडे खूपच वाढल्याची चिन्हे आहेत. दिल्ली ते मुंबई विमानाचे भाडे तब्बल २०,००० रुपयांपेक्षाही जास्त झाल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत रद्द झालेली विमान उड्डाणे
- बेंगळुरू- ४२
- दिल्ली- ३८
- अहमदाबाद- २५
- इंदूर- ११
- हैदराबाद- १९
- सुरत- ८
- कोलकाता- १०
इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, खराब हवामान, सिस्टीममधील बिघाड आणि नवीन कर्मचारी नियमांमुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि पुढील ४८ तासांत विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत केली जाईल. इंडिगोच्या विमान सेवा बंद पडल्याने देशातील जवळजवळ प्रत्येक विमानतळावर परिणाम होत आहे. दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि सुरत विमानतळांवर प्रवाशांना सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विमान समस्या का उद्भवली?
इंडिगोचे उड्डाण रद्द होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत . काहींचे म्हणणे आहे की सिस्टममधील बिघाड आणि कर्मचाऱ्यांची कमतरता ही मुख्य कारणे आहेत. तथापि, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने (FIP) हा दावा स्पष्टपणे नाकारला आहे. FIP च्या मते, इंडिगोच्या समस्या त्यांच्या स्वतःच्या दीर्घकालीन धोरणांमुळे आहेत. गेल्या काही वर्षांत कंपनीने जाणूनबुजून खूप कमी पायलट नियुक्त केले आहेत, ज्यामुळे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत.