भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 22:31 IST2025-08-15T22:29:49+5:302025-08-15T22:31:26+5:30

Dr. Seema Rao : एका पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्राची निवड करून त्यात आपला दबदबा निर्माण करणारी भारताची 'वंडर वुमन' म्हणजे डॉ. सीमा राव. भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला कॉम्बॅट ट्रेनर अशी त्यांची ओळख! 

India's 'Wonder Woman', who trained men in the army; Dr. Seema Rao reveals her journey on the stage of 'Malhar'! | भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!

भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!

Dr. Seema Rao Journey : असं म्हणतात, की आजच्या युगात स्त्री करू शकत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही आणि हे अगदीच खरं आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसते. मात्र, २५ वर्षांपूर्वी कदाचित काळ इतका प्रगत नव्हता. मात्र, तरीही अशा काळात एका पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्राची निवड करून त्यात आपला दबदबा निर्माण करणारी भारताची 'वंडर वुमन' म्हणजे डॉ. सीमा राव. भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला कॉम्बॅट ट्रेनर अशी त्यांची ओळख! 

डॉ. सीमा राव यांनी आतापर्यंत २०,००० पेक्षा जास्त भारतीय सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे. यात भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस दलातील सैनिकांचा समावेश आहे. तसेच, त्यांनी एनएसजी ब्लॅक कॅट्स (NSG Black Cats), अँटी टेरर स्क्वॉड (Anti Terror Squad), हवाई दलाची गरुड कमांडो फोर्स (Garud Commando Force) आणि नौदल-मरीन कमांडो (Navy-Marine Commandos) यांसारख्या विशेष दलांनाही प्रशिक्षण दिले आहे.

'मल्हार २०२५'मध्ये डॉ. सीमा राव यांची उपस्थिती!

त्यांच्या या कारकिर्दीसाठी भारत सरकारने त्यांना 'नारी शक्ती' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील केले. डॉ. सीमा राव यांना हे क्षेत्र का निवडावसं वाटलं? याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलं. 'सेंट झेवियर्स' कॉलेजच्या प्रसिद्ध 'मल्हार २०२५'च्या मंचावर सीमा राव यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसोबत आपले अनुभव तर त्यांनी शेअर केलेच, मात्र हा प्रवास सुरू करण्याचा 'तो' क्षण नेमका कोणता होता याचा देखील खुलासा केला. 

भारताची वंडर वुमन!

गेली २५ वर्षे डॉ. सीमा राव यांनी भारताची 'वंडर वुमन' बनवून सेवा केली. हा प्रवास अतिशय कठीण होता, पण तरीही त्यांनी या क्षेत्रात केवळ पाऊलच टाकलं नाही, तर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सीमा यांना पहिल्यापासूनच साहसाची आवड होती. 'धाडस' हा गुण त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. घरातच वातावरण साहसी असताना सहाजिकच सीमा यांच्यातही तेच गुण उतरले. 

कशी झाली सुरुवात?
सीमा यांनी आवड म्हणून मार्शल आर्ट्स प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. त्यांचे पती यात त्यांना सोबत करत होते. सीमा यांनी ब्रूस लीच्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीकडून 'जीत कुन डो' हा मार्शल आर्ट्सचा प्रकार शिकून घेतला होता. लग्न होण्यापूर्वी सीमा आणि त्यांचे पती एकत्र मार्शल आर्ट्स ट्रेनिंग घेत होते. रोज सकाळी चर्नी रोडच्या चौपाटीवर त्यांचं प्रशिक्षण असायचं. दोघे तिथे सराव देखील करायचे. एके दिवशी सीमा आणि त्यांच्या पतीचे सराव सत्र संपल्यानंतर, दोघे घरी परतत असताना, तिथे उभ्या असलेल्या एका उनाड टोळक्याने त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करायला सुरुवात केली. ते मुद्दामहून सीमा यांना त्रास देऊ लागले. अशा वेळी काय करावं हे सुचतच नसलेल्या सीमा यांनी त्यांच्या पतीकडे पाहिलं. मात्र, 'ही लढाई तुझी आहे आणि तुलाच लढावी लागेल', असं म्हणत त्यांच्या पतीने त्यांना हिम्मत दिली.  

अन् त्यांना तिथेच धडा शिकवला!

सुरुवातीला सीमा यांनी या तरुणांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ते तरुण त्रास देत होते. अखेर चिडलेल्या सीमा यांनी आपल्या मार्शल आर्टचा एक मूव्ह या तरुणावर आजमावला आणि क्षणार्धात त्याला तिथेच गार केलं. यानंतर या टोळक्यातील इतर काही मुलांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमा यांनी त्यांनाही चोख उत्तर दिलं. इथूनच त्यांच्या मनात भारतीय सैन्यात जाण्याचा विचार आला. पुढे त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.  

प्रयत्न करणं सोडू नका!

मुंबईच्या एका चाळीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज त्यांना जगभरात एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. आजच्या तरुण पिढीला सल्ला देताना डॉ. सीमा राव म्हणतात की, "जर तुम्ही प्रयत्न केले, तर तुमचे प्रयत्नच तुम्हाला पुढे नेतात. त्यामुळे प्रयत्न करणं कधीच सोडू नका. पैशाच्या मागे धावताना आपली स्वप्न मागे राहणार नाहीत याचीही काळजी घ्या. पैसा हा जगण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकेच आपले ध्येय हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे आहे." 

Web Title: India's 'Wonder Woman', who trained men in the army; Dr. Seema Rao reveals her journey on the stage of 'Malhar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.