'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:59 IST2025-10-19T08:58:23+5:302025-10-19T08:59:03+5:30
Bangladesh Voter List: पश्चिम बंगालमधील एका डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह बांगलादेशच्या मतदार यादीत आढळल्याने खळबळ. पोलीस चौकशी करत आहेत; दुहेरी नोंदीवर प्रश्नचिन्ह.

'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या गोबरडांगा परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथील एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे भारतासह शेजारील देश बांगलादेशच्या मतदार यादीतआढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मतदार ओळखपत्रातील मोठ्या घोळाकडे लक्ष वेधणारा आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबरडांगा येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. गौतम ढाली यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे भारतीय मतदार यादीत तर आहेतच; पण त्याचसोबत बांगलादेशातील सातक्षीरा भागाच्या मतदार यादीतही त्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. ढाली कुटुंबाकडे वैध आधार कार्ड आणि भारतीय मतदार ओळखपत्र (बेड़गूम-२ ग्रामपंचायतीचे १६४ नंबर बूथ) असताना, परदेशातील यादीत त्यांची नोंदणी कशी झाली, हा मोठा प्रश्न आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने डॉ. गौतम ढाली यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, डॉ. ढाली यांचे वडील तारकनाथ ढाली यांनी खुलासा केला की, त्यांचे कुटुंब सुमारे १० वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले आणि तेव्हापासून ते गोबरडांगा येथे राहत आहेत. त्यांनी कायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचा दावा केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून वैध कागदपत्रे आणि दस्तऐवज सादर करण्याची मागणी केली आहे.
प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
जर या कुटुंबाची नावे बांगलादेशात मतदानासाठी नोंदवलेली होती, तर त्यांना भारतीय मतदार ओळखपत्र कसे मिळाले? या 'दुहेरी' नोंदीमागील यंत्रणात्मक त्रुटी काय आहे किंवा हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे, याबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक बेड़गूम-२ ग्रामपंचायतीच्या प्रमुखांनी याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले असून, राज्य प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहे. सीमावर्ती भागातील मतदारांच्या याद्यांची फेरतपासणी आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या कथित भ्रष्टाचाराची शक्यता पडताळून पाहणे आवश्यक झाले आहे.