नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचे पडसाद आता हिंद महासागरातही उमटताना दिसत आहेत. श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौका बुडवल्याची घटना समोर आल्यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल गांधींचा सरकारवर हल्ला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, 'लवकरच एक मोठे वादळ येणार आहे. जग सध्या अत्यंत अस्थिर काळातून जात आहे आणि भारतासाठी परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. भारताचा तेल पुरवठा धोक्यात आला आहे. भारतात येणाऱ्या तेलापैकी 40 टक्क्यांहून अधिक होमुर्झमार्गे येते.'
'त्यामुळे या भागात वाढणारा संघर्ष भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. एलपीजी आणि एलएनजीच्या पुरवठ्याबाबतही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. लढाई आता आपल्या अंगणापर्यंत पोहोचली आहे. हिंद महासागरात इराणी जहाज बुडाले, तरीही पंतप्रधान शांत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला कारभारावर स्थिर हात हवा आहे. मात्र, भारताकडे एक तडजोड करणारा पंतप्रधान आहे, ज्यांनी आपली धोरणात्मक स्वायत्तता सोडून दिली,' अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
‘मिलान’ नौदल सरावाचा संदर्भ
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीदेखील या प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या इराणी युद्धनौकेवर हल्ला झाला, ती काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणममध्ये आयोजित भारतीय नौदलाच्या मिलान नौदल सरावात सहभागी झाली होती. 19 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान झालेल्या या बहुराष्ट्रीय सरावात ती जहाज भारताची ‘अतिथी’ होती. भारताच्या समुद्री क्षेत्रातून बाहेर पडताच त्या जहाजावर हल्ला होणे अत्यंत धक्कादायक आहे, असे रमेश यांनी म्हटले
भारतासाठी चिंता का?
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. भारत आपल्या सुमारे 80 टक्के ऊर्जा गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. हिंद महासागरातील वाढती लष्करी हालचाल जागतिक व्यापार मार्ग, तेल आणि ऊर्जा पुरवठा साखळी, समुद्री वाहतूक आणि विमा दरांवर परिणाम करू शकते. विरोधकांचा आरोप आहे की सरकारची भूमिका स्पष्ट न झाल्यास भारताच्या आर्थिक आणि रणनीतिक हितांवर परिणाम होऊ शकतो.
Web Summary : Tensions in the Indian Ocean, following the reported sinking of an Iranian warship, have sparked political turmoil. Rahul Gandhi criticizes the PM's compromising stance threatening India's oil supply, with over 40% relying on the Strait of Hormuz, raising concerns about energy security and strategic autonomy.
Web Summary : ईरानी युद्धपोत के डूबने की खबरों के बाद हिंद महासागर में तनाव से राजनीतिक उथल-पुथल मच गई है। राहुल गांधी ने भारत की तेल आपूर्ति को खतरे में डालने वाले पीएम के समझौतेवादी रुख की आलोचना की, 40% से अधिक होर्मुज जलडमरूमध्य पर निर्भर हैं, जिससे ऊर्जा सुरक्षा और रणनीतिक स्वायत्तता को लेकर चिंताएं बढ़ गई हैं।