पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:45 IST2025-07-24T05:44:49+5:302025-07-24T05:45:08+5:30
भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
बीजिंग : भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयाने भारत-चीनदरम्यान गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण झालेल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने २०२० मध्ये, मुख्यतः कोविड-१९ महासाथीमुळे, चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा स्थगित केला होता. मात्र, त्यानंतर लडाखमधील गलवान खोऱ्यातील सैन्यसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध कायम राहिले होते.
भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदनात सांगितले की, चिनी नागरिक गुरुवारपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेबाबत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीही अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.
सकारात्मक पाऊल - चीन
भारताच्या या निर्णयाचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, ‘हे एक सकारात्मक पाऊल आहे. सीमा ओलांडून प्रवास सुलभ करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.
एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर निर्णय
हा निर्णय भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. जयशंकर यांनी १४-१५ जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनला भेट दिली होती.
त्यांनी या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशीही संवाद साधला. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रादेखील सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक दिशा मिळत असल्याचे दिसते.