खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 20:13 IST2023-05-18T20:13:18+5:302023-05-18T20:13:44+5:30
खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार
अयोध्या : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. २३ एप्रिलपासून सुरू झालेली आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. ब्रिजभूषण यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करा, ही मागणी पैलवानांची आहे. अशातच खासदार ब्रिजभूषण सिंह ५ जून रोजी अयोध्येत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यात अयोध्या, प्रयागराज आणि हरिद्वारचे सर्व संत सहभागी होणार आहेत. खरं तर हा साधू-संतांचा कार्यक्रम असल्याचे बोलले जात आहे, पण ब्रिजभूषण सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण आपली ताकद दाखवून साधु-संतांकडे पाठिंबा मागण्याबाबत बोलू शकतात, असे बोलले जात आहे. सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. पण याप्रकरणी ब्रिजभूषण यांना अटक करावी, अशी जंतरमंतरवर जमलेल्या कुस्तीपटूंची मागणी आहे. तर खासदार ब्रिजभूषण सातत्याने स्पष्टीकरण देत आहेत. त्यांनी अनेक व्हिडीओ जारी करून याप्रकरणी स्वत: निर्दोष असल्याचे सांगितले आहे.
आखाड्याबाहेरील कुस्ती
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता आंदोलनाला २६ दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत