‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:32 IST2025-05-09T09:31:08+5:302025-05-09T09:32:53+5:30
Operation Sindoor: भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
Operation Sindoor: भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. श्रीगंगानगर, बाडमेर, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर या राजस्थानातील सीमावर्ती भागातील शहरांमध्ये ब्लॅक आऊट लावण्यात आला. यानंतर आता भारतीय रेल्वे अलर्ट मोडवर आहे. भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. भारतीय रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था या भारतीय लष्करी ट्रेनसेवांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
प्राप्त माहितीनुसार, भारतीय रेल्वे बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून सैन्याच्या ट्रेनबाबत गोपनीय माहिती मागू शकतात. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, लष्करी रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीसोबत अशी माहिती शेअर करणे सुरक्षेचे उल्लंघन मानले जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरेल. अशा कोणत्याही कॉल किंवा संभाषणांपासून दूर राहण्याचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मिलिटरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष शाखा आहे जी सुरक्षा दलांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवते. त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावध राहा. लष्करी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संपर्काची त्वरित तक्रार करा. प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.