केंद्राचा महत्वकांशी प्रकल्प; ‘चिकन्स नेक’जवळ अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर, चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:56 IST2026-02-09T13:55:40+5:302026-02-09T13:56:50+5:30

Indian Railways : चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर; संरक्षण दलांचे कर्मचारी, लष्करी साहित्य आणि आपत्कालीन मदत सामग्रीची सुरक्षितपणे हालचाल करता येणार!

Indian Railways: Centre's ambitious project; Underground railway corridor to be built near 'Chicken's Neck' | केंद्राचा महत्वकांशी प्रकल्प; ‘चिकन्स नेक’जवळ अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर, चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर

केंद्राचा महत्वकांशी प्रकल्प; ‘चिकन्स नेक’जवळ अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर, चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर

Indian Railways : भारताच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांना मुख्य भूमीशी जोडणारा आणि ‘चिकन्स नेक’ म्हणून ओळखला जाणारा सिलीगुडी कॉरिडोर हा रणनीतिकदृष्ट्या देशाचा महत्त्वाचा भाग आहे. चीनसह शेजारी देशांतील घडामोडी आणि सीमावर्ती संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता या परिसरातील सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून येथे अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर उभारण्यात येणार आहे.

‘चिकन्स नेक’ म्हणजे काय?

‘चिकन्स नेक’ म्हणजे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी कॉरिडोर (जमिनीची एक अरुंद, सुमारे २२ किलोमीटर रुंद पट्टी), जो भारताच्या मुख्य भूमीला उत्तर-पूर्वेकडील राज्यांशी जोडतो. हा भाग बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि चीनच्या जवळ असल्याने तो रणनीतिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो.

अंडरग्राउंड रेल्वे प्रकल्पाचा निर्णय

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी माहिती देताना सांगितले की, ‘चिकन्स नेक’ परिसरात अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर उभारला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित वाहतूक, अखंड कनेक्टिव्हिटी आणि सैनिकी लॉजिस्टिक्स मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.

मार्ग आणि तांत्रिक तपशील

हा प्रकल्प नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून राबवण्यात येणार आहे. प्रस्तावित अंडरग्राउंड मार्ग टिन माइल हाट-रंगापानी-बागडोगरा असा असेल. याची एकूण लांबी ३५.८ किमी असेल. हा मार्ग प्रामुख्याने भूमिगत ठेवण्यात येणार असून, संवेदनशील सिलीगुडी कॉरिडोरमध्ये अखंड व सुरक्षित दळणवळण सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे.

का आहे हा प्रकल्प विशेष?

आंतरराष्ट्रीय सीमांच्या जवळून जाणाऱ्या या अंडरग्राउंड रेल्वे मार्गामुळे सुरक्षा अडचणी, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या काळातही कनेक्टिव्हिटी अबाधित राहील. संरक्षण दलांचे कर्मचारी, लष्करी साहित्य आणि आपत्कालीन मदत सामग्री यांची हालचाल सुरक्षितपणे करता येणार आहे.

अत्याधुनिक सुविधा

मीडिया अहवालानुसार, नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, हा प्रकल्प बागडोगरा एअर फोर्स स्टेशन आणि बेंगडुबी येथील भारतीय लष्कराच्या ३३ कोअर कॅन्टोनमेंटजवळून जाणार असल्याने एअर-रेल लॉजिस्टिक्स इंटिग्रेशनलाही चालना मिळेल.

प्रकल्पात पुढील सुविधा प्रस्तावित आहेत:

2×25 kV AC इलेक्ट्रिफिकेशन सिस्टम

OFC आणि क्वाड केबलवर आधारित VOIP कम्युनिकेशन

ऑटोमॅटिक सिग्नलिंग (स्टँडर्ड-IV)

RDSO 25-टन अ‍ॅक्सल लोड मानकानुसार पूल

TBM तंत्रज्ञानाद्वारे ट्विन टनेल आणि क्रॉसओव्हरसाठी NATM टनेल

याशिवाय, मालदा-डिब्रूगढ दरम्यान आणखी एक जोड ट्रॅक टाकण्याचा प्रस्ताव असून, त्याची व्यवहार्यता (FLS) जवळपास पूर्ण झाली आहे.

बांगलादेश सीमेजवळील महत्त्व

दार्जिलिंगमधील टिन माइल हाट ते रंगापानी या भागात उभारली जाणारी अंडरग्राउंड टनेल रेल्वे सिलीगुडीपासून सुमारे १० किमी अंतरावर आहे आणि बांगलादेशच्या पंचगढपासून केवळ ६८ किमी दूर आहे. त्यामुळे या परिसरातील निगराणी आणि सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

अंडरग्राउंड कॉरिडोरची गरज का?

रेल्वे हा मालवाहतुकीचा सर्वात जलद आणि किफायतशीर मार्ग आहे. एक मालगाडी सुमारे ३०० ट्रकइतका माल वाहून नेऊ शकते. सध्या ‘चिकन्स नेक’मधील बहुतांश पायाभूत सुविधा जमिनीवर आहेत, ज्यांना हल्ले किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे धोका संभवतो. अंडरग्राउंड टनेलमुळे हे धोके मोठ्या प्रमाणात कमी होतील. याशिवाय, हा कॉरिडोर हवाई हल्ले, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण देईल. युद्धकाळात सैनिकांची हालचाल तसेच इंधन आणि आवश्यक साहित्याची वाहतूक सुलभ होईल. बागडोगरा एअरफोर्स बेस आणि बेंगडुबी येथील लष्करी छावणीशी थेट समन्वय साधण्यासही मदत होणार आहे.
 

Web Title : भारत 'चिकन नेक' के पास सुरक्षा के लिए भूमिगत रेल बनाएगा।

Web Summary : भारत सिलीगुड़ी कॉरिडोर, या 'चिकन नेक,' के पास सुरक्षा, कनेक्टिविटी और सैन्य रसद को बढ़ाने के लिए एक भूमिगत रेलवे कॉरिडोर का निर्माण करेगा। इस परियोजना का उद्देश्य आपात स्थिति के दौरान निर्बाध परिवहन सुनिश्चित करना और संवेदनशील सीमा क्षेत्र के साथ रक्षा क्षमताओं को मजबूत करना है।

Web Title : India to build underground rail near 'Chicken's Neck' for security.

Web Summary : India will construct an underground railway corridor near the Siliguri Corridor, or 'Chicken's Neck,' to enhance security, connectivity, and military logistics amid regional sensitivities. The project aims to ensure uninterrupted transport during emergencies and strengthen defense capabilities along the sensitive border area.