‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:35 IST2025-05-09T14:35:40+5:302025-05-09T14:35:51+5:30
Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी भारतीय रेल्वेने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा बदला घेण्यासाठी जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. यानंतर देशपातळीवर हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही दलांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यातच भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून उधमपूर-जम्मू-दिल्ली या मार्गावर विशेष ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने म्हटले आहे की, उधमपूर, जम्मू आणि दिल्ली या मार्गावर तीन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या तिन्ही गाड्या अनारक्षित असतील. ज्या प्रवाशांना आरक्षण मिळालेले नाही. ते या ट्रेन सेवांचा लाभ घेऊ शकतात. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान भारतीय निवासी क्षेत्रे आणि लष्करी आस्थापनांवर सतत हल्ले करत आहे, ज्यामुळे या भागातील धोका थोडा वाढला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी ट्रेन सेवा
जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांच्या परतीसाठी भारतीय रेल्वेने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. ज्या जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट येथून धावतील. रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाक अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकने जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सरकारने सीमावर्ती भागात विमान सेवांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भारतीय रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था या भारतीय लष्करी ट्रेनसेवांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.