“महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर, २०२९ला मुंबईत बुलेट ट्रेन”: अश्विनी वैष्णव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:31 IST2026-02-03T14:26:52+5:302026-02-03T14:31:17+5:30
Railway Minister Ashwini Vaishnaw Reaction On Bullet Train To Mumbai: बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर, २०२९ला मुंबईत बुलेट ट्रेन”: अश्विनी वैष्णव
Railway Minister Ashwini Vaishnaw Reaction On Bullet Train To Mumbai: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७पर्यंत सुरू होणार आहे. बुलेट ट्रेन गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि मागणी वाढल्यास पीक अवरमध्ये १५ मिनिटांत एक ट्रेन चालवली जाऊ शकते. तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
राज्यासाठी दोन नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून मुंबईहून पुण्याला अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचता येईल. आयटी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक क्षेत्रासाठी बुलेट ट्रेन फायदेशीर ठरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ७ नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. तसेच २०२९ पर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन सुरू होईल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर
बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून, सर्व ठिकाणची स्टेशन अत्याधुनिक आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नाही. कामे रोखून ठेवली. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर झाला आहे. सरकार बदलल्यावर आवश्यक परवानग्या देण्यात आल्या. प्रकल्पाला गती मिळाली. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम ठाण्यापर्यंत पूर्ण होईल आणि २०२९ पर्यंत पूर्ण मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन धावू शकणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
दरम्यान, ईस्ट-वेस्ट जे कॉरिडोर आपण करत आहोत, तो देशाला ईस्ट-वेस्ट जोडणार आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदरापर्यंत याची मार्गिका असणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. गुजरातचे रेल्वे बजेट सर्वांत जास्त आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.