संघर्षात भारताचा माणुसकीचा हात! इराणच्या युद्धनौकेतील सैनिकांना वाचवण्यासाठी नौदलाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 20:56 IST2026-03-05T20:50:57+5:302026-03-05T20:56:09+5:30

अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवली; भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य

Indian Navy Becomes Savior at Sea Massive SAR Operation Launched After Iranian Frigate Sinks | संघर्षात भारताचा माणुसकीचा हात! इराणच्या युद्धनौकेतील सैनिकांना वाचवण्यासाठी नौदलाचा पुढाकार

संघर्षात भारताचा माणुसकीचा हात! इराणच्या युद्धनौकेतील सैनिकांना वाचवण्यासाठी नौदलाचा पुढाकार

Indian Navy on IRIS Dena: मध्य आशियातील युद्धाचे लोन आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. विशाखापट्टणम येथील नौदल सराव आटपून परतणाऱ्या इराणच्या आयआरआयएस देना या युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीने टॉरपेडो हल्ला करून ती हिंदी महासागरात बुडवली. श्रीलंकेच्या गाले किनारपट्टीपासून साधारण ४० नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्रात ही थरारक घटना घडली. या भीषण संकटानंतर भारतीय नौदलाने मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्काळ मोठी बचाव मोहीम हाती घेतली आहे.

४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आयआरआयएस देना या इराणी युद्धनौकेवरून संकटाचा संदेश कोलंबो येथील मरीन रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरला प्राप्त झाला. अमेरिकन पाणबुडीने डागलेल्या टॉरपेडोमुळे युद्धनौकेवर मोठा स्फोट झाला आणि काही वेळातच ती समुद्रात गडप झाली. या जहाजावर सुमारे १३० खलाशी आणि अधिकारी तैनात होते.

भारतीय नौदलाची 'सुपरफास्ट' मोहीम

घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या मदतीला धाव घेतली. सकाळी १० वाजताच भारतीय नौदलाचे लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान शोधमोहिमेसाठी रवाना झाले. दुसरे एक विमान लाईफ राफ्ट्ससह सज्ज ठेवण्यात आले आहे. जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस तरंगिणी या प्रशिक्षण नौकेला तात्काळ घटनास्थळी वळवण्यात आले. कोची येथून आयएनएस इक्षक हे सर्वेक्षण जहाज बेपत्ता खलाशांच्या शोधासाठी रवाना झाले असून ते सध्या घटनास्थळी शोध घेत आहे.

अमेरिकेची कबुली आणि इराणचा इशारा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी पेंटागॉनमध्ये या हल्ल्याची कबुली दिली. हा हल्ला टॉरपेडोने साध्य केला, असे सांगत त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी संताप व्यक्त केला. "भारताची पाहुणी असलेल्या आमच्या युद्धनौकेवर विनाकारण हल्ला करणे हे एक क्रूर कृत्य आहे. अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा इशारा त्यांनी दिला आहे.

श्रीलंकेची कोंडी

श्रीलंकेने या संघर्षात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, श्रीलंकेच्या चहाचा इराण हा मोठा खरेदीदार असल्याने आणि घटना श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात घडल्याने कोलंबोवर राजनैतिक दबाव वाढला आहे. श्रीलंका नौदल आणि भारतीय नौदल सध्या संयुक्तपणे बेपत्ता खलाशांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे, इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता आशियाई सागरी मार्गावर पोहोचल्याने भारताची चिंता वाढली आहे. विशाखापट्टणम येथील सरावानंतर परतणाऱ्या जहाजावर हल्ला झाल्याने सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title : युद्धपोत पर हमले के बाद भारत ने ईरानी नाविकों को बचाया: नौसेना अभियान

Web Summary : श्रीलंका के पास एक ईरानी युद्धपोत पर टारपीडो से हमला होने के बाद, भारतीय नौसेना ने बचाव अभियान शुरू किया। संकट कॉल का जवाब देते हुए, नौसेना ने क्षेत्र में बढ़ते तनाव के बीच लापता नाविकों की तलाश के लिए विमान और जहाजों को तैनात किया, और मानवीय सहायता प्रदान की।

Web Title : India Rescues Iranian Sailors After Warship Attack: Naval Operation

Web Summary : After an Iranian warship was torpedoed near Sri Lanka, the Indian Navy launched a rescue operation. Responding to a distress call, the Navy deployed aircraft and ships to search for missing sailors, offering humanitarian assistance amidst escalating tensions in the region.