मोठी बातमी! १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला २९ वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:46 PM2022-02-04T23:46:24+5:302022-02-04T23:47:21+5:30

mumbai blast 1993: अबू बकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु असून, लवकरच त्याला भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

indian agencies arrested mumbai blast 1993 terrorist abu bakar abdul gafur shaikh from uae after 29 years | मोठी बातमी! १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला २९ वर्षांनी अटक

मोठी बातमी! १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला २९ वर्षांनी अटक

googlenewsNext

नवी दिल्ली: सन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवले होते. देशातील सर्वांत मोठा बॉम्बस्फोट असल्याचे सांगितले जाते. यामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर, ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. यातच परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला मोठे यश आले असून, या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला तब्बल २९ वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

यासंदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर २९ वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. 

लवकरच भारतात आणले जाणार?

अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन १९९७ मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अबू बकर यांचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोने, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.
 

Web Title: indian agencies arrested mumbai blast 1993 terrorist abu bakar abdul gafur shaikh from uae after 29 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.