'इंधनाचे दर वाढणार; भारताला युद्धाची किंमत मोजावी लागेल', राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:01 IST2026-03-06T18:57:04+5:302026-03-06T19:01:12+5:30

'युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढू शकतात, देशाच्या आर्थिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो.'

'India will have to pay the price of war', Rahul Gandhi warns Modi government | 'इंधनाचे दर वाढणार; भारताला युद्धाची किंमत मोजावी लागेल', राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

'इंधनाचे दर वाढणार; भारताला युद्धाची किंमत मोजावी लागेल', राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षावरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी इशारा देत म्हटले की, अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची किंमत भारताला मोजावी लागू शकते. राहुल गांधी यांच्या मते, या युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढू शकतात तसेच देशाच्या आर्थिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो.

जागतिक शक्तींमधील रणनीतिक स्पर्धा

राहुल गांधी म्हणाले की, वरकरणी हा संघर्ष अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाटत असला तरी, प्रत्यक्षात तो अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील जागतिक रणनीतिक स्पर्धेचे प्रतिबिंब आहे. अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर चीन वेगाने प्रगती करत असून त्या अंतराला कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

ऊर्जा पुरवठ्यावर वाढता ताण

राहुल गांधी यांनी सांगितले की, मध्यपूर्व हा जगातील ऊर्जा उत्पादनाचा मोठा केंद्रबिंदू आहे. या भागातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर दबाव वाढत आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. येथे तणाव वाढल्यास त्याचे परिणाम केवळ या प्रदेशापुरते मर्यादित न राहता जगभर जाणवतील.

भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

राहुल गांधी यांनी असेही म्हटले की, मोठ्या शक्तींच्या संघर्षाचा परिणाम इतर देशांनाही भोगावा लागतो. विशेषतः भारतासारख्या देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो, कारण भारताचे मध्यपूर्वेतील ऊर्जा आयातीवर मोठे अवलंबित्व आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा मोठा हिस्सा याच प्रदेशातून आयात केला जातो.

इंधन महागण्याचा इशारा

जर मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिला, तर ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होऊ शकतो. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेगही मंदावण्याची शक्यता असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

भारताने स्पष्ट भूमिका घ्यावी

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारताने या परिस्थितीत अत्यंत सावधपणे पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा केवळ इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष नसून जागतिक पातळीवर मोठ्या बदलांचे संकेत देणारी परिस्थिती आहे. जग अधिक अस्थिर आणि धोकादायक टप्प्यात प्रवेश करत असल्याने भारताने आपली धोरणात्मक भूमिका स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे.

Web Title : युद्ध का ख़तरा: राहुल गांधी ने भारत में ईंधन की कीमतों में वृद्धि की चेतावनी दी

Web Summary : राहुल गांधी ने चेतावनी दी है कि मध्य पूर्व में तनाव के कारण भारत को ईंधन की कीमतों में वृद्धि और आर्थिक मंदी का सामना करना पड़ेगा, जो वैश्विक शक्ति संघर्ष का प्रतिबिंब है। उन्होंने रणनीतिक सावधानी बरतने का आग्रह किया।

Web Title : War's Cost: Rahul Gandhi Warns Fuel Price Hike for India

Web Summary : Rahul Gandhi warns India faces rising fuel costs and economic slowdown due to Middle East tensions, a reflection of global power struggles. He urges strategic caution.