मध्य पूर्वेतील युद्धाची मोठी किंमत भारताला मोजावी लागेल; राहुल गांधींचा सरकारला इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:52 IST2026-03-06T17:52:04+5:302026-03-06T17:52:52+5:30
america israel iran war: अमेरिका आणि इस्रायल- इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाची मोठी किंमत भारताला मोजावी लागेल; राहुल गांधींचा सरकारला इशारा!
मध्य पूर्वेतील इस्रायल आणि अमेरिका- इराण यांच्यात धुमसणाऱ्या युद्धाचे पडसाद भारताच्या अर्थव्यवस्थेवर उमटणार असून, केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. हे युद्ध केवळ प्रादेशिक नसून जागतिक महासत्तांमधील वर्चस्वाच्या लढाईचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, भारताची ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेतील आयातीवर अवलंबून आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात. वाढत्या महागाईमुळे भारताचा आर्थिक विकास दर मंदावण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या सागरी मार्गाचा उल्लेख करत धोक्याची सूचना दिली. जगातील तेल पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या युद्धाचा परिणाम केवळ या प्रदेशापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाला, विशेषतः भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या मते, अमेरिका जागतिक शक्ती म्हणून आपले वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडत आहे.
"जेव्हा हे देश एकमेकांशी लढतात, तेव्हा त्याचा थेट फटका ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांना बसतो. भारताने या जागतिक घडामोडींकडे केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता भविष्यातील आर्थिक संकटासाठी सज्ज राहावे," असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.