भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 03:00 IST2025-05-17T02:58:09+5:302025-05-17T03:00:18+5:30

दहशतवाद्यांचा ताबा हवा; उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी केली जाणार मागणी, विश्वसनीयता सिद्ध करायची? मग दहशतवादी द्या...

india wants hafiz saeed masood azhar and dawood ibrahim and hand over the list of most wanted to pakistan | भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार

भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपविण्यात येणार आहे.

हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर, दाऊद इब्राहिम हा १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. 

विश्वसनीयता सिद्ध करायची? मग दहशतवादी द्या... 

पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद थांबेपर्यंत पाणी मिळणार नाही, हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे विधान कठोर भूमिका दर्शवते. पाकिस्तानने त्यांची विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, असा आग्रह भारत करू शकतो. भारतीय एजन्सी इंटरपोलद्वारे रेड-कॉर्नर नोटीसचा पाठपुरावा करत आहेत. 

यापैकी बरेच जण संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेले जागतिक दहशतवादी आहेत. त्यांच्या सहभागाचे पुरावे असलेले अनेक कागदपत्रे पाकिस्तानला सादर करण्यात आली आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये मोठे धोरणात्मक बदल होत नाहीत तोपर्यंत थेट प्रत्यार्पण अशक्य आहे.

आतापर्यंत झाले काय? 

भारताने अनेक दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माध्यमाचा वापर केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रे, जी- २० सहकारी, आंतरराष्ट्रीय न्यायालये किंवा करार यासारख्या बहुपक्षीय व्यासपीठांचा देखील वापर केला आहे.

हा दहशतवादीही हवाय... 

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात महत्त्वाचा सहभाग असलेला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. इंटरपोलने नोटीस जारी केली. तो उघडपणे पाकिस्तानात काम करतो.

 

Web Title: india wants hafiz saeed masood azhar and dawood ibrahim and hand over the list of most wanted to pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.