मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:52 IST2025-05-14T11:50:39+5:302025-05-14T11:52:23+5:30
India Vs Pakistan Tension: शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम शॉ गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले होते.

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एलओसीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. हा जवान आज परत मायदेशी आला आहे. अटारी बॉर्डरवर पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांचा ताबा भारताकडे सोपविला आहे.
शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम शॉ गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले होते. काहीच माहिती मिळत नसल्याने शॉ यांची गर्भवती पत्नी फिरोजपूरला पोहोचली होती. पतीला सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलली जात आहेत हे जाणून घेण्यासाठी ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये आली होती. बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून संतोषजनक माहिती नाही मिळाली तर मी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे, असे त्यांच्या पत्नीने म्हटले होते. 23 एप्रिल रोजी शॉ पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. आज २० दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले आहे.
कसे गेले पाकिस्तानच्या ताब्यात...
सीमेजवळ काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाचे संरक्षण करण्यासाठी शॉ यांची ड्युटी लागली होती. यावेळी ते आराम करण्यासाठी जवळच्याच झाडाखाली गेले. यावेळी त्यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले, असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. शॉ हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.
VIDEO | Punjab: Visuals from Attari Border.
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2025
Pakistan handed over BSF jawan Purnam Shaw, apprehended by Rangers on April 23, at Attari border, earlier today.#BSF#AttariBorder
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/3nqs1BHjX5
शॉला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी सीमा दलांनी "ध्वज बैठक" आयोजित केली होती परंतु त्याच्या कुटुंबाला अधिक माहिती देण्यात आली नव्हती. अखेर आज सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्यावर शॉ यांची सुटका करण्यात आली आहे.