तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST2025-05-28T11:11:37+5:302025-05-28T11:12:05+5:30
India vs pakistan, Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत.

तिन्ही संरक्षण दलांमध्ये अचूक ताळमेळ साधला जाणार; केंद्र सरकारने नवे नियम लागू केले...
पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई युद्धामध्ये भारताच्या तिन्ही दलांनी अत्यंत योग्य समन्वय राखत पाकिस्तानचे सर्व हल्ले फोल ठरविले. जमिनीवरून मारा करताना हवेतूनही अचूक मारा करण्यात आला. याचा परिणाम म्हणून भारतासमोर चारच दिवसांत पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि शस्त्रसंधीची भीक मागू लागला. या पार्श्वभूमीवर तिन्ही दलांमध्ये अधिक ताळमेळ साधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे. आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत तयार केलेले नियम राजपत्र अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले आहेत. हे नवे नियम २७ मेपासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे तिन्ही सैन्यांदरम्यान संदेश वहन, युद्धाच्या वेळी एकमेकांच्या चाली समजून घेणे, एकत्रित शत्रूवर वार करणे आदी सोपे होणार आहे. काही वर्षांपूर्वी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी सीडीएस हे पद निर्माण करण्यात आले होते. याचाही फायदा या युद्धात झाला आहे.
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय सैन्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातील युद्ध सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत एकूण समन्वय आणि वेळेत युद्धाची तयारी आणि युद्ध केल्याबद्दल सैन्याची प्रशंसा केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मेच्या पहाटे पाकिस्तानातील तसेच पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील फोल ठरविण्यात आला. या कामी हवाई दल आणि सैन्य दलाने योग्य समन्वय राखत पाकिस्तानवर हल्ले चढविले होते. यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले, असे चौहान म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.