भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:31 IST2026-02-04T14:29:08+5:302026-02-04T14:31:11+5:30

एनडीए खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य, ‘एनडीए’तील घटक पक्षांकडून कराराबद्दल मोदी यांचे अभिनंदन 

India-US trade deal is a 'big decision', it will be beneficial for everyone in the country | भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: भारत-अमेरिका व्यापार करार हा मोठा निर्णय असून, तो देशातील सर्वांसाठी लाभदायक ठरेल, तसेच आमचे सरकार नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी काम करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या सदस्यांनी युरोपियन युनियन आणि अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार करारांबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. 

व्यापार करारांतर्गत अमेरिकाभारतीय वस्तूंवरील रेसिप्रोकल टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे. मोदी म्हणाले की, अमेरिका, युरोपियन युनियनशी झालेले करार भारतीय उत्पादक, निर्यातदार आणि उद्योजकांना बळकटी देतील.  

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर त्यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नऊ व्यापार करार पूर्ण झाले आहेत. भारताचे एकूण ३९ देशांशी व्यापार करार झाले आहेत. शिंदेसेनेचे खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, भारत-अमेरिका आणि भारत-युरोप यांच्यातील व्यापार करारांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते. 

व्यापारी कराराचे एनडीए खासदारांकडून स्वागत

शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फलदायी चर्चेनंतर ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याची घोषणा झाली.
या घडामोडींचे एनडीए खासदारांनी बैठकीत स्वागत केले. या बैठकीत भाजपचे नवे अध्यक्ष नितीन नबीन यांचे अभिनंदन केले.

करारामुळे संबंध होणार आणखी दृढ : अमित शाह

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढेल, तसेच व्यापार संबंध अधिक दृढ होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांनाही मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक करारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी अभिनंदन करतो.

घाईगर्दीने मतप्रदर्शन अयोग्य : मायावती

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय वस्तूंवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अमेरिकेचा निर्णय देशाच्या हिताचा आहे की नाही, हे ठरविणे सध्या घाईगर्दीचे ठरेल. भारत-अमेरिका व्यापारी कराराचे संपूर्ण तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच कराराचा देशावर, विशेषतः बहुजन, गरीब, आणि महिलांच्या भवितव्यावर कसा परिणाम होतो, हे स्पष्ट होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने या व्यापार करारावर सविस्तर स्पष्टीकरण दिल्यास ते अधिक चांगले होईल.

दुग्धव्यवसायाच्या हिताचे करारामुळे रक्षण - गोयल 

भारताने अमेरिकेशी एक अतिशय चांगला व्यापार करार केला आहे. त्यामध्ये देशातील कृषी व दुग्धव्यवसायाच्या हिताचे रक्षण करण्यात आले आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी सांगितले. कराराचे स्वरूप स्पष्ट करणारे संयुक्त निवेदन भारत-अमेरिकेतर्फे लवकरच जारी केले जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title : भारत-अमेरिका व्यापार समझौता: भारतीयों के लिए बड़ा और फायदेमंद निर्णय

Web Summary : पीएम मोदी ने भारत-अमेरिका व्यापार समझौते को सभी के लिए फायदेमंद बताया। समझौते से भारतीय निर्यात को बढ़ावा मिलेगा। एनडीए सांसदों ने समझौते का स्वागत किया, जबकि मायावती ने सावधानीपूर्वक आकलन करने का आह्वान किया। यह समझौता संबंधों को मजबूत करेगा।

Web Title : India-US trade deal: A major, beneficial decision for all Indians.

Web Summary : PM Modi hails the India-US trade deal as beneficial for all. The agreement reduces reciprocal tariffs, boosting Indian exports. NDA MPs welcome the deal, while Mayawati calls for careful assessment. The deal will strengthen relations.