भेटवस्तूंमधून व्यक्त झाले भारत-अमेरिका मैत्रीसंबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:12 IST2026-01-31T06:12:12+5:302026-01-31T06:12:50+5:30
India-US Friendship: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भारतीय नेते-सरकारी अधिकाऱ्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह विविध अमेरिकी नेत्यांना दिलेली भेटवस्तूंची यादी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे.

भेटवस्तूंमधून व्यक्त झाले भारत-अमेरिका मैत्रीसंबंध
न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भारतीय नेते-सरकारी अधिकाऱ्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह विविध अमेरिकी नेत्यांना दिलेली भेटवस्तूंची यादी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे.
या यादीत भौतिक भेटवस्तू, तसेच प्रवास किंवा किमान मर्यादेपेक्षा जास्त खर्चाच्या प्रवास खर्चाच्या अहवालाचा समावेश आहे. २०२४ साठी ही किमान मर्यादा ४८० अमेरिकी डॉलर आहे. याशिवाय यादीत १० सप्टेंबर २०२३ रोजी मोदी यांनी जो बायडेन यांना भेट म्हणून दिलेली लाकडी संदुक, स्कार्फ, केसर आणि चहापत्तीसाठी वापरात येणारा लाकडी डबा यांचा समावेश आहे. याची अंदाजे किंमत ५६२ डॉलर आहे.
या वस्तू अमेरिकेच्या राष्ट्रीय अभिलेखा विभागाला हस्तांतरित करण्यात आल्या होत्या, तर केसर किंवा चहापत्तीसारख्या नाशवंत वस्तूंची अमेरिकी गुप्तहेर विभागाच्या धोरणानुसार विल्हेवाट लावण्यात आली होती.
ट्रेन सेट, पश्मिना शाल
२०२४ रोजी मोदींनी बायडेन यांना ७,७५० डॉलर मूल्याचा स्टर्लिंग सिल्व्हर मेटल ट्रेन सेट भेट दिला होता. मोदींनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी अमेरिकेच्या माजी ‘फर्स्ट लेडी’ जिल बायडेन यांना पश्मिना शाल भेट दिली होती. याची अंदाजे किंमत ९६९ डॉलर होती.
अन्य भेटवस्तूंचाही उल्लेख
१८ ऑक्टोबर २०२४ रोजी मोदींनी अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना ‘भगवान कृष्ण रासलीला चांदीचा बॉक्स’ भेट दिला होता. याची किंमत १,३३० डॉलर आहे.
याच दिवशी हॅरिस यांचे पती डग्लस एमहॉफ यांना ५८५ डॉलर मूल्याची ‘कफ लिंक’ भेट दिली.
२४ नोव्हेंबर २०२२ रोजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी तत्कालीन अमेरिकी संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांना ३,७०० डॉलरची ‘शिव नटराज कांस्य मूर्ती’ भेट दिली.