आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:23 IST2025-10-09T18:22:34+5:302025-10-09T18:23:10+5:30
India-UK Relation : व्यापार, शिक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात नवे पर्व सुरू; पीएम मोदी आणि ब्रिटनचे पीएम कीर स्टारमर यांची व्यापार करारावर स्वाक्षरी!

आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
India-UK Relation : भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक मजबूत झाले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी गुरुवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या द्विपक्षीय चर्चेत व्यापार, सुरक्षा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि गुंतवणूक अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी ‘व्हिजन 2030’ अंतर्गत भारत-ब्रिटन संबंधांना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी विस्तृत आर्थिक आणि व्यापार करारावर (CETA) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आयात खर्च कमी होईल, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि उद्योग, तसेच ग्राहक या दोघांनाही फायदा होईल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, ब्रिटनमधील 9 नामांकित विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस उघडणार आहेत. हे शिक्षण आणि नवोपक्रम क्षेत्रातील भारत-यूके सहकार्याचे ऐतिहासिक पाऊल आहे. या भागीदारीमुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देशातच मिळेल.
भारत-यूके संबंध उल्लेखनीय प्रगतीच्या मार्गावर- मोदी
संयुक्त निवेदनात मोदी म्हणाले की, पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत-ब्रिटन संबंधांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. जुलै महिन्यात माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान झालेला व्यापार करार हा ऐतिहासिक टप्पा होता. भारत आणि यूके हे लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याच्या अधिपत्यासारख्या समान मूल्यांवर आधारित नैसर्गिक भागीदार आहेत. जागतिक अस्थिरतेच्या या काळात आपली भागीदारी स्थैर्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
Other issues that featured prominently in our talks included technology, defence, AI, sustainable development, renewable energy and more. It was also a delight to meet the Vice Chancellors of various UK universities. We will keep furthering educational and cultural linkages with… pic.twitter.com/dqKwNhSOn7
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2025
आमची भागीदारी विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधारित
मोदींनी असेही सांगितले की, भारतातील वायुदल प्रशिक्षक आता ब्रिटनच्या रॉयल एअर इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार आहेत, तसेच दोन्ही देशांचे नौदल एकत्रित सरावदेखील करत आहेत. यूकेमध्ये स्थायिक असलेले 18 लाख भारतीय या मैत्रीचे जिवंत दुवे आहेत. मोदी पुढे म्हणाले, भारताचे डायनॅमिझम आणि यूकेची एक्सपर्टीज एकत्र आल्याने एक अद्वितीय समन्वय तयार झाला आहे. आमची भागीदारी ‘ट्रस्टवर्दी, टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन’ आहे. आम्ही दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहोत.
भविष्यावर केंद्रित भागीदारी- स्टार्मर
संयुक्त निवेदनात स्टार्मर म्हणाले की, जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. काही महिन्यांनंतर भारतात येणे आनंददायी आहे. आम्ही भविष्याभिमुख, आधुनिक भागीदारी उभी करत आहोत. व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार वाढेल, रोजगार निर्माण होतील आणि जनजीवन सुधारेल. भारताचे उद्दिष्ट 2028 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे आहे आणि पंतप्रधान मोदींचे ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.” स्टार्मर यांनी भाषणाच्या शेवटी हिंदीतून ‘दीवाली की शुभकामनाएं’ देऊन भारतीय जनतेबद्दल आपला स्नेह व्यक्त केला.