"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:41 IST2025-12-26T18:41:08+5:302025-12-26T18:41:48+5:30
India on Bangladesh Violence on Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या भूमिकेवरही मांडली भूमिका

"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
India on Bangladesh Violence on Hindu: सध्या भारतात अनेक विषय गाजत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार, एच१बी व्हिसा, ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ला आणि कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूवर शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली.
रणधीर जयस्वाल यांनी अमेरिकेच्या व्हिसा मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, "सरकारला देशातील नागरिकांकडून असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या व्हिसा अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल करण्यात अडचणी येत आहेत. व्हिसा-संबंधित मुद्दे कोणत्याही देशाच्या सार्वभौम अधिकारक्षेत्रात येतात आणि आम्ही हे मुद्दे आणि आमच्या चिंता अमेरिकेपुढे मांडल्या आहेत. अनेक लोक बऱ्याच काळापासून अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांना तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. आपल्या नागरिकांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेशी संवाद साधत काम करत आहे."
बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंविरुद्ध जे घडत आहे, तो चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलिकडेच एका हिंदू तरुणाच्या हत्येचा आम्ही निषेध करतो. आम्हाला आशा आहे की या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा होईल. भारत बांगलादेशातील लोकांशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्हाला बांगलादेशमध्ये शांतता आणि स्थैर्य हवे आहे. आम्ही बांगलादेशमध्ये मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि सहभागी निवडणुकांसाठी सातत्याने आवाहन केले आहे."
ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवरील दहशतवादी हल्ल्यावर रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांनी जे घडवून आणले, त्यात होरपळलेल्यांची आम्हाला जाणीव आहे. या प्रकरणाबाबत अधिकारी इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. भारतात फरार आणि कायद्याने हवे असलेले गुन्हेगार परत आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. या उद्देशाने आम्ही अनेक देशांशी चर्चा करत आहोत आणि ही प्रक्रिया सुरू आहे. कायदेशीर गुंतागुंत आहे, परंतु आम्ही त्यांना भारतात परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत," असेही ते म्हणाले.