नवी दिल्ली - अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने शनिवारी दिली. मात्र पत्रे, दस्तऐवज, १०० अमेरिकी डॉलरपर्यंतच्या भेटवस्तू भारतातून अमेरिकेला पाठविण्याची सेवा सुरू राहणार आहे.
३० जुलै रोजी अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार २९ ऑगस्टपासून १०० डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमाशुल्क लागू होणार आहे. पत्रे, कागदपत्रे व १०० डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तूंना मात्र सूट राहणार आहे.
यासंदर्भात अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने (सीबीपी) १५ ऑगस्ट रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. मात्र, पात्र संस्था कोणत्या व सीमाशुल्क गोळा कोण करणार याबाबत त्यात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अमेरिकेसाठी मालवाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी २५ ऑगस्टनंतर टपाल स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. अमेरिकेने टपालसेवेवरील सीमाशुल्क धोरण स्पष्ट करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.