अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:34 IST2025-12-24T17:34:24+5:302025-12-24T17:34:54+5:30
या चाचणीबाबत कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. ना त्याच्या रेंजबाबत अथवा व्हेरिएंटबाबत माहिती दिली आहे.

अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
नवी दिल्ली - भारत आपली सैन्य क्षमता वेगाने मॉडर्न बनवण्यासाठी झटपट करत आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या शत्रूंपासून भारताला कायम धोका असतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारताच्या सुरक्षेशी तडजोड नको त्यासाठी सैन्य तत्पर असते. त्यातच भारताने कुठलाही गाजावाजा न करता एक मोठा धमाका केला आहे. ज्याचा आवाज दूरदूरवर पोहचला आहे. भारताने पश्चिम बंगालच्या खाडीत समुद्रातून लॉन्च होणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइलचं यशस्वी चाचणी केली आहे. त्यामुळे भारत यापुढे जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणाहून अण्वस्त्रे हल्ल्याची क्षमता ठेवतो हे स्पष्ट झाले आहे. या चाचणीपूर्वी भारताने विशाखापट्टनम किनारपट्टीवर नोटम जारी केला होता. त्याची रेंज ३२४० किमी होती.
या चाचणीबाबत कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. ना त्याच्या रेंजबाबत अथवा व्हेरिएंटबाबत माहिती दिली आहे. परंतु संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले की, के-४ एसएलबीएम मिसाइलची ही चाचणी असू शकते. स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी आयएनएस अरिघाटमधून ही मिसाइल डागण्यात आल्याचं बोललं जाते. काही रिपोर्टनमध्ये पुढील पिढीतील के-५ ची चाचणी घेतल्याचे संकेत आहेत तर काहींमध्ये के-४ चाचणी असल्याचे बोलले जात आहे. ही चाचणी २३ तारखेच्या सकाळी झाली असं छापून आले आहे.
मागील काही वर्षांमध्ये भारताने एसएलबीएम टेस्टिंग कार्यक्रमाला वेग आणला आहे. भारताने बंगालच्या खाडीत अणुऊर्जेवर चालणाऱ्या के-4 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे भारताने सेकेंड स्टाईक हल्ला करण्याची क्षमता प्राप्त केली. यामुळे दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये त्याचे स्थान आणि प्रभाव आणखी मजबूत झाला. के ४ चे पूर्ण नाव कलाम ४ आहे. ही भारताची स्वदेशी सबमरीन लॉन्च्ड बॅलेस्टिक मिसाइल आहे जी डीआरडिओने विकसित केली आहे. ही अण्वस्त्रे सक्षम अरिहंत पाणबुडीसारखे INS अरिहंत आणि INS अरिघाटवरून लॉन्च केली जाऊ शकते. त्याची मारक क्षमता जवळपास ३५०० किमी आहे. जी पाकिस्तान आणि चीनच्या प्रमुख टार्गेटपर्यंत पोहचण्यास सक्षम आहे.
हे क्षेपणास्त्र १२ मीटर लांब, १.३ मीटर व्यासाचे आणि अंदाजे १७ टन वजनाचे आहे. ते २ टनांपर्यंतचे वॉरहेड वाहून नेऊ शकते आणि हे इंधनावर चालणारे, दोन टप्प्यांचे क्षेपणास्त्र आहे. गेल्या काही वर्षांत K-4 च्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. अंतिम विकसित चाचणी २०२० मध्ये यशस्वी झाली. पहिले यशस्वी पाणबुडी प्रक्षेपण नोव्हेंबर २०२४ मध्ये आयएनएस अरिघाटमधून करण्यात आले. मंगळवार २३ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात आणखी एक गुप्त चाचणी घेण्यात आली. ही चाचणी भारताच्या न्यूक्लियर ट्रायड (जमीन, हवाई आणि समुद्री हल्ला) ला आणखी बळकट करते आणि त्याची सेकंड स्ट्राइक हल्ल्याची क्षमता वाढवते.