2014 नंतर देशाची वाटचाल चुकीच्या दिशेनं- अमर्त्य सेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 11:18 IST2018-07-09T11:16:32+5:302018-07-09T11:18:12+5:30
नोबेल पुरस्कार विजेते सेन यांचा मोदी सरकारवर निशाणा

2014 नंतर देशाची वाटचाल चुकीच्या दिशेनं- अमर्त्य सेन
नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे. मात्र 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं चुकीच्या दिशेनं मोठी उडी घेतल्याचं म्हणत सेन यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
'2014 पासून आर्थिक आघाडीवरील चित्र अतिशय निराशाजनक आहे. आपली वाटचाल उलट दिशेनं सुरू आहे. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था अशी आपली ओळख आहे. मात्र आता आपण वेगानं पिछाडीवर जात आहोत,' असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं. नोबेल पुरस्कारप्राप्त अमर्त्य सेन यांच्या 'भारत और उसके विरोधाभास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल संपन्न झाला. हे पुस्तक सेन यांच्या 'अॅन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अॅण्ड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन' पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे.
'शेजारी देशांचा विचार करता वीस वर्षांपूर्वी नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या शेजारी देशांशी तुलना करता भारताची परिस्थिती चांगली होती. सर्वोत्तम अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक त्यावेळी दुसरा होता. मात्र आता भारताची अवस्था अतिशय वाईट आहे. पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यानंतर आपला क्रमांक लागतो,' असं सेन म्हणाले. असमानता आणि जाती व्यवस्थेकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागत असल्याचं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.