शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:28 IST2025-12-25T15:26:04+5:302025-12-25T15:28:24+5:30
Shashi Tharoor on Sheikh Hasina : बांगलादेशातील सत्तांतरानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे.

शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
Shashi Tharoor on Sheikh Hasina : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बांगलादेश्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सुरक्षेबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. भारताने शेख हसीना यांना परत जाण्यास भाग पाडले नाही, हे मानवीय दृष्टिकोनातून योग्य पाऊल असल्याचे थरूर यांनी म्हटले.
जुनी मैत्री, मानवीय भूमिका
न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना शशी थरूर म्हणाले, शेख हसीना यांच्या बाबतीत भारताने योग्य मानवीय भावना दाखवली आहे. अनेक वर्षांपासून त्यांची भारताशी चांगली मैत्री राहिली आहे. त्यामुळे कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास होईपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
प्रत्यार्पण कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे
थरूर यांनी स्पष्ट केले की, प्रत्यार्पणाशी संबंधित प्रकरणांमध्ये जटिल कायदेशीर तरतुदी, आंतरराष्ट्रीय करार आणि अपवाद असतात. या गोष्टी फार कमी लोकांना पूर्णपणे समजतात. अंतिम निर्णय सरकारने सर्व बाबींचा विचार करून घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: On Bangladesh's former PM Sheikh Hasina, Congress MP Shashi Tharoor says, "As far as Sheikh Hasina is concerned, India has acted in the right humanitarian spirit to not force somebody back who has been a good friend of India for many years. A… pic.twitter.com/VYxfK1u09s
— ANI (@ANI) December 25, 2025
तोपर्यंत सुरक्षा आवश्यक
एक चांगल्या मित्रदेशाच्या नेत्याबाबत आदरातिथ्य दाखवत असताना, सरकारने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करेपर्यंत शेख हसीना यांना सुरक्षित ठेवणे योग्य ठरेल, असे मतही थरूर यांनी व्यक्त केले.
ढाक्यातील घडामोडींवर लक्ष
थरूर यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा ढाक्यात तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. हादी हे गेल्या वर्षी जुलैमध्ये बांगलादेशात झालेल्या उठावाशी संबंधित प्रमुख व्यक्ती मानले जात होते. राजधानीत झालेल्या त्यांच्या हत्येमुळे देशात राजकीय अस्थिरता, आंदोलन आणि निदर्शने सुरू झाली आहेत.
भारतविरोधी आंदोलन, व्हिसा सेवा स्थगित
या घटनेनंतर बांगलादेशात भारतविरोधी निदर्शने तीव्र झाली. त्यानंतर बांगलादेश सरकारने भारतातील बांगलादेशी राजनैतिक मिशनबाहेर झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील व्हिसा सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची घोषणा केली आहे.