एआय क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हावे : अदानी, ऊर्जा, कॉम्प्युट अन् क्लाउड या तीन स्तंभांवर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:57 IST2026-02-20T11:57:02+5:302026-02-20T11:57:45+5:30
गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव असलेल्या जीत अदानी यांनी भारताच्या ‘बौद्धिक शतका’चा रोडमॅप मांडताना ऊर्जा, कॉम्प्युट आणि क्लाउड या तीन स्तंभांवर भर दिला.

एआय क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हावे : अदानी, ऊर्जा, कॉम्प्युट अन् क्लाउड या तीन स्तंभांवर भर
नवी दिल्ली : ‘भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानासाठी इतर देशांच्या आयातीवर अवलंबून न राहता स्वतःच्या भक्कम पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात,’ असे प्रतिपादन अदानी समूहाचे कार्यकारी संचालक जीत अदानी यांनी केले. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये ते बोलत होते.
गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव असलेल्या जीत अदानी यांनी भारताच्या ‘बौद्धिक शतका’चा रोडमॅप मांडताना ऊर्जा, कॉम्प्युट आणि क्लाउड या तीन स्तंभांवर भर दिला.
एआय क्षेत्रात भारत बनणार जगातील प्रभावशाली देश
‘एआय तंत्रज्ञानाचा वापर व विस्तारात भारताला जगातील अत्यंत प्रभावशाली देश बनण्याची मोठी संधी आहे,’ असे विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले. आगामी काळात भारत या तंत्रज्ञानाला कशा प्रकारे प्रतिसाद देतो, यावर देशाचे आर्थिक भविष्यच नाही, तर १०० कोटींहून अधिक लोकांच्या समस्या सोडवण्याची आपली क्षमताही अवलंबून असेल, असे ते म्हणाले.
‘एआय’मुळे प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार : पिचाई
‘एआय’ मानवी प्रगतीचा वेग कैकपटींनी वाढवणारे साधन आहे. येणारा काळ हा ‘एआय’च्या क्रांतीचा असून, याने विज्ञानातील नवे शोध लागतील व भारतासारख्या विकसनशील देशांना प्रगतीची मोठी झेप घेता येईल, असे ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले.
पिचाई म्हणाले की, आपल्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा जागतिक बदल आहे. आपण मोठ्या शोधांच्या उंबरठ्यावर उभे आहोत. मात्र, हे यश आपोआप मिळणार नाही. एआय सर्वांसाठी उपयुक्त व्हावी, यासाठी धाडसाने आणि जबाबदारीने काम करावे लागेल.