Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानने केलेले सगळे ड्रोन हल्ले भारताने परतवून लावले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी मध्यस्थी केली. भारत आणि पाकिस्तानात युद्धविराम झाल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच होत्या. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला एक दावा भारताने फेटाळला आहे.
भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व अढळ आणि शक्तिशाली होते. आम्ही तुझ्यासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करू. परंतु, हे थांबायला हवे. जर तुम्ही ते थांबवले तर आम्ही व्यापार करू. जर तुम्ही हे थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही. माझ्यासारखा व्यवसाय कधीही अन्य लोकांनी केला नाही. अचानक त्यांनी मला सांगितले की, आम्हाला थांबायला हवे आणि त्यांनी तसे केले, हे मी तुम्हाला सांगू शकतो, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. हा दावा भारताने फेटाळून लावला.
चर्चेत ते मुद्दे नव्हते
भारताने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ९ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ८ मे आणि १० मे रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. १० मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, १० मे रोजी भारताने पाकिस्तानमधील एका प्रमुख एअर बेसवर कारवाई केली, तेव्हा दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे सचिव रुबियो यांनी प्रथम पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. यानंतर एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. मार्को रुबियो यांनी विचारले होते की, पाकिस्तान गोळीबार थांबवण्यास तयार आहे का आणि भारत हे मान्य करेल का? याला उत्तर देताना भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर त्यांनी हल्ला केला नाही तर आम्हीही हल्ला करणार नाही.